कोरोनात जपली माणुसकी; हॅप्पी क्लबने केले साडेचारशे जणांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 05:49 PM2021-03-18T17:49:29+5:302021-03-18T17:49:57+5:30
corona warriors from Nanded अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी मुस्लिम तरुणांच्या हॅप्पी क्लबने ही जबाबदारी घेतली.
- शिवराज बिचेवार
नांदेड : ज्यावेळी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे येत नव्हते, त्यावेळी नांदेडातील मुस्लिम तरुणांच्या हॅप्पी क्लबने पुढाकार घेऊन माणुसकी जपली. महापालिकेकडून फक्त पीपीई कीट घेऊन या तरुणांनी नि:स्वार्थपणे जवळपास साडेचारशेहून अधिक जणांवर अंत्यसंस्कार केले. त्याबद्दल प्रशासनाकडून हॅप्पी क्लबचा नुकताच गौरव करण्यात आला. यापुढेही ही सेवा सुरू ठेवण्याचा मानस या तरुणांनी व्यक्त केला.
नांदेडात आतापर्यंत कोराेनामुळे ६१० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्या एप्रिल महिन्यात गेला होता. पीरबुऱ्हाणनगर येथील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी मुस्लिम तरुणांच्या हॅप्पी क्लबने ही जबाबदारी घेतली. त्यानंतर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सर्वच मृतदेहांवर या तरुणांनी अंत्यसंस्कार केले. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही. एकाच दिवशी जवळपास सात ते आठ अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली. या कामात जवळपास ४० तरुण सहभागी झाले होते. अंत्यसंस्कार केल्यानंतर अंगावर सॅनिटायझरचा फवारा मारायचा अन् नंतर कार्यालयात गेल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची अन् त्यानंतरच घर गाठायचे, असा त्यांचा नित्यक्रम होता. आपण केलेल्या कामाच्या समाधानामुळे रात्री झोपही चांगली यायची, अशी प्रतिक्रिया या तरुणांनी दिली.
परमेश्वराने आमची निवड केली याचा आनंद
कोरोनाने मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे नव्हते. नातलग दूर थांबत होते. अशावेळी आम्हीच त्यांचे नातेवाईक होऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी परमेश्वराने आमची निवड केली, असे वाटते. पटापट मरणारी माणसे पाहून दु:खही व्हायचे; परंतु अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंदही होता.
- मोहंमद शोएब मोहंमद खालेद
आपल्यामुळे घरी कोरोना होणार नाही याची चिंता
दररोज अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर घरी परत जायची भीती वाटायची. आपल्यामुळे आपल्या चिमुकल्यांना किंवा इतर सदस्यांना कोरोना झाला तर कसे? याची चिंता असायची. घरी अनेक वेळा तसे बोलूनही दाखविले; परंतु कुटुंबातील सदस्यांनीही हे परमेश्वराचे काम आहे असे म्हणून धीर दिला.
- शेख आफताब शेख युनूस
हे आहेत हॅप्पी क्लबचे मेंबर
हॅप्पी क्लबमध्ये मोहंमद शोएब मोहंमद खालेद, शेख आफताब शेख युनूस, कुरेशी मो. दाईम गौस कुरेशी, मोहंमद कासीम खान मुनवर खान, मोहंमद मोईज बागवान अब्दुल हबीब, जुनेद खान सौदागर रशीद खान, मिर्झा सोहेल मिर्झा अताउल्ला बेग, अब्दुल सलाम मोहम्मद अफसर, सय्यद यासीन अली सय्यद युनूस अली, सय्यद बिलाल सय्यद बशीर आदींचा समावेश असून, या सर्वांचा प्रशासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.