माणुसकी लोप पावतेय; कोरोनामुक्त वृद्धाच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेसह नागरिकांची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 06:10 PM2020-09-17T18:10:16+5:302020-09-17T18:13:22+5:30
कोरोनाची धास्ती अनेकांनी घेतली आहे़ या भीतीतूनच नात्यागोत्यासह समाजही संकटाच्या वेळी दूर जात असल्याचे दिसते़
धर्माबाद (जि़नांदेड) : कोरोनाच्या दहशतीमुळे समाज माणुसकीही विसरत असल्याचा कटू अनुभव धर्माबाद येथील एका कुटुंबियाला आला़ मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी सहकार्य केले नाही़ पालिकेकडे विनंती केल्यानंतर त्यांच्याकडूनही मदत न मिळाल्याने कुटुंबियातीलच काही जणांनी एकत्रित येऊन मध्यरात्री या वृद्धावर अंत्यसंस्कार केले़
माणसाचा मृत्यू अटळ आहे, कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू पावतोच. मात्र सध्या कोरोनाची धास्ती अनेकांनी घेतली आहे़ या भीतीतूनच नात्यागोत्यासह समाजही संकटाच्या वेळी दूर जात असल्याचे दिसते़ धर्माबाद शहरातील इंदिरानगर येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी माधवराव माने यांचा ९ सप्टेंबर रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला़ नांदेड येथील दवाखान्यात जागा उपलब्ध नसल्याने ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना रात्रभर ठेवण्यात आले़ त्यानंतर १० सप्टेंबर रोजी सकाळी निजामाबाद येथील शासकीय दवाखान्यात जावई सुरेश सोनकांबळे घेऊन गेले.
उपचारानंतर १५ सप्टेंबर रोजी त्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला. ठणठणीत झालेल्या वडिलांना मुलगा संजय याने आपल्या गावी घरी आणले. मात्र घरी आल्यानंतर त्याच दिवशी पाच तासांनी १५ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मात्र कोरोनामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा म्हणून अंत्यसंस्कारासाठी कोणीही फिरकले नाही़ एवढेच नव्हे तर नगरपालिकेकडे यासाठी सहकार्य मागितले असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने एका माजी नगरसेवकाच्या मदतीने कुटुंबातीलच मुले, जावई व घरातील इतर मंडळीच्या उपस्थितीत रात्री बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
कुटुंबातल्या लोकांनी अंत्यसंस्कार केले़
कोरोना पॉझिटिव्हमुळे मृत्यू झाला असा समज करून रात्रीच्या वेळी कुणीही मदत करण्यास तयार नाही़ अशावेळी माजी सभापती गंगाधर जारीकोटकर यांनी मोलाचे सहकार्य केले. नगरपालिकेचा ट्रॅक्टर मागितला पण नगरपालीकेनेही सहकार्य केले नाही़ विशेष म्हणजे कोणताही ड्रायव्हर येण्यास भीत होता़ अखेर खाजगी टेम्पो तयार करून वैकुंठधाम येथील स्मशानभूमीत रात्री बारा वाजता कुटुंबातल्या लोकांनी अंत्यसंस्कार केले़
- संजय माने (मयताचा मुलगा)
ड्रायव्हर व इतर कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली़
अंत्यसंस्कारासाठी सहकार्य मागितल्यानंतर याबाबतची माहिती तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना दिली होती़ यावर निजामाबाद येथून उपचार करून आल्यानंतर सदर वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहेत याचीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ मात्र त्यानंतरही मी पालिका कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या, परंतु ड्रायव्हर व इतर कर्मचारी यांनी येण्यास टाळाटाळ केली़ त्यानंतर माने कुटुंबियांना सकाळी अंत्यसंस्कार करू या असा निरोप दिला होता़ मात्र त्यांनी रात्रीच अंत्यसंस्कार उरकले़
- विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष, धर्माबाद़