नांदेडमध्ये शेकडो ज्येष्ठ नागरिक उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:10 AM2018-05-06T01:10:01+5:302018-05-06T01:10:01+5:30
ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाने परिसर दणाणून गेला होता़ वार्धक्यामुळे नीट चालताही येत नसलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहाय्यकाच्या मदतीने या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाने परिसर दणाणून गेला होता़ वार्धक्यामुळे नीट चालताही येत नसलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहाय्यकाच्या मदतीने या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला़
देशाच्या लोकसंख्येच्या १५ टक्के संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे़ शहरी भागापेक्षा गाव, खेड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे़ दारिद्र्य रेषेखाली जीवन जगावे लागत असून दोन वेळaच्या जेवणाचीही भ्रांत पडते़ १ आॅक्टोबर २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने सदोष ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले़ परंतु, प्रत्यक्षात त्याचीही अंमलबजावणी करण्यात आली नाही़ याबाबत अनेकवेळा आंदोलने करण्यात आली़ परंतु, सरकारने त्याची दखल घेतली नाही़ त्यामुळे शनिवारी ज्येष्ठ नागरिक संघाने आंदोलनाची हाक दिली होती़ त्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून शेकडो ज्येष्ठ नागरिक वजिराबाद चौकात सकाळी जमले होते़ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला़ यामध्ये सत्तरीच्या आसपास व त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांनी मोठ्या हिरीरिने सहभाग घेतला़ महिलांची संख्याही लक्षणीय होती़ त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागण्यांचे निवेदन पाठविले़
यावेळी अध्यक्ष डॉ़हंसराज वैद्य, व्यंकटेश बुलबुले, सुभाष त्रिपाठी, एस़जीग़ायकवाड, प्रा़देवदत्त तुंगार, माधवराव पवार, जी़आऱगिरी, प्रभा चौधरी, भगवान वाघमारे, शंकर मुदिराज, रामबाई मुदिराज, भाऊसाहेब हंबर्डे, नाना हंबर्डे, माधव झुलवाड, नागारोव वने, बालाजी तालिकवार, दत्ता वाघमारे, धोंडिबा ससाणे, चंद्रकांत देशमुख, अनुसयाबाई निलेवाड यांच्यासह शेकडो ज्येष्ठांचा सहभाग होता़
या मागण्यांसाठी केले आंदोलन
ज्येष्ठांची वयोमर्यादा इतर राज्यांत ६० वर्षे आहे़ परंतु, महाराष्ट्रात ती ६५ करण्यात आली आहे़ आता न्यायालयानेही त्याबाबत आदेश देवून ज्येष्ठांची वयोमर्यादा ६० करण्याचे निर्देश दिले आहेत़ इतर राज्यांप्रमाणे उत्पन्नाची मर्यादा न ठेवता महागाईचा विचार करुन व ज्येष्ठांच्या नियमित आरोग्यसमस्या पाहता प्रतिमाह साडेतीन हजार रुपये मानधन सुरु करावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी दारिद्र्य रेषेखाली नावाची अट रद्द करावी, आरोग्यदायी योजनेतील दारिद्र्य रेषेखाली असण्याची अट रद्द करावी, सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा योजना सुरु करावीत, संपूर्ण राज्य, मनपा हद्द, नगरपालिका हद्दीत बससेवेत ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत द्यावी, प्रवासी गाडी, विमान, बसमध्ये किमान पाच जागा ज्येष्ठांसाठी आरक्षित असाव्यात आदी मागण्या नमूद करण्यात आल्या़