वन्य प्राण्याची शिकार करणे जावईबुवाला पडले महागात; सासुरवाडी ऐवजी कोठडीत घेतायत पाहुणचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 02:25 PM2020-08-18T14:25:23+5:302020-08-18T14:28:07+5:30
या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात आहे़
तामसा (जि़नांदेड) : वाळकी बाजार शिवारात वन्य प्राण्याची शिकार करून खाण्यासाठी ते शिजविल्याच्या आरोपावरून एकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सदरील पाहुणा ‘जावईबापू’ असून तो सासुरवाडीत ‘सामिष’ भोजनासाठी मांस सोबत घेऊनच आला होता़ हे जावईबुवा सध्या वन विभागाच्या कोठडीत ‘पाहुणचार’ घेत आहेत.
भाणेगाव तांडा (ता़हदगाव) येथील सुधाकर मोहन राठोड हे वाळकी बाजार येथील आपल्या सासुरवाडीत आले होते़ ‘सामिष’ भोजनासाठी ते मांस सोबत घेऊनच पोहोचले. सासुरवाडीच्यांनी जेवणाची जंगी तयारीही केली. परंतु जावईबुवाच्या या पाहुणचारापूर्वीच त्या ठिकाणी वन विभागाचे पथक पोहोचले़ यावेळी त्यांनी सुधाकर राठोड यांना ताब्यात घेतले़ तसेच शिजविलेल्या मांसाचे नमुनेही घेण्यात आले़ हे मांसाचे नमुने हैदराबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ हे मांस रानडुकराचे आहे की हरणाचे की अन्य कोणत्या प्राण्याचे; हे अहवालात स्पष्ट होईल. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात आहे़
तालुका वनअधिकारी शरयू रुद्रावार, वनपरिमंडळ अधिकारी मनोज गुरसाळी, वनरक्षक निलपत्रेवार यांनी ही कारवाई केली़ या प्रकरणातील सुधाकर राठोड याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वन कोठडी सुनावली़ विशेष म्हणजे, याच भागात दीड महिन्यापूर्वी रानडुकराला खाण्यासाठी शिकार केल्याची घटना घडली होती. ज्यामध्ये एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी झाली. पण त्यात काही निष्पन्न झाले नाही.