एकाच चितेवर पतीपत्नीचे अंत्यसंस्कार, दीराच्या अंत्यविधीवेळी पत्नीच्या आक्रोशाने सारे सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 05:26 PM2022-07-16T17:26:11+5:302022-07-16T17:26:44+5:30
सासूसासरे अडवत असतानाही सुरेखा गेली आणि दोघा भावांच्या सोबत तिनेही जीव गमावला
मनाठा (नांदेड): शुक्रवारी झालेल्या अपघातात मृत पतीपत्नीला एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मृत दिरावरही तेथे वेगळ्या चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दिराच्या पत्नीने टाहो फोडल्याने सारे सुन्न झाले होते.
सतीश मसाजी टोपलेवार याचे आईवडील भाऊ मानसिक रुग्ण आहेत. अख्ख कुटुंब त्याच्यावर अवलंबून होते. त्याची सासुरवाडी हदगावला आहे. सतीशचे काका पंढरपूरहून परत आले होते. त्यांना भेटण्यासाठी तो गावी बामणीला आला होता. तर सुरेखा व संतोष टोपलेवार हदगावला उसतोड मजुरीचे पैसे मुकादमाकडून घेण्यासाठी जाणार होते.
सुरेखा रिक्षाने जात होत्या पण तीच पैसे ठेवून घेईल असे वाटल्याने संतोषने तिलाही सतीशच्या दुचाकीवर नेले. सुरेखाचे सासूसासरे तिला अडवत होते. मात्र, पतीमुळे तीचा नाईलाज झाला. काही वेळाने दुचाकी चुकीच्या दिशेने वळवल्यानेच अपघात झाला आणि तिघांचाही मृत्यू झाला. आज सुरेखा व संतोष यांना एकाच चितेवर अंत्यविधी करण्यात आला. तर सतीशच्या अंत्यसंस्कारावेळी त्याच्या पत्नीने फोडलेल्या टाहोने उपस्थित सारेच सुन्न झाले होते.