जमिनीच्या वादातून पती, पत्नीस विष पाजून जिवे मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 07:57 PM2020-06-19T19:57:23+5:302020-06-19T19:59:45+5:30
तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी समाजातील पंचांसमक्ष बैठकही झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही.
माहूर/वाईबाजार (जि. नांदेड) : माहूर तालुक्यातील जुनापाणी येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीस भावकीतील लोकांनी बळजबरीने विष पाजून ठार मारले. बंडू राठोड (५२) आणि यशोदाबाई राठोड (४५), अशी मृतांची नावे आहेत. सिंदखेड पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी मध्यरात्री ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून गुरुवारी दोघांना अटक केली आहे.
हुमाणी बंडू राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० जून रोजी सकाळी सातच्या सुमारास खंडू मिसू राठोड, राजेश मिसू राठोड, बेबीबाई खंडू राठोड, प्रियंका राजेश राठोड, कांताबाई मिसू राठोड, संजय मिसू राठोड, निखिल खंडू राठोड, निकिता खंडू राठोड व पांडू मिसू राठोड यांनी बंडू राठोड, यशोदाबाई राठोड यांना मारहाण करुन जबरदस्तीने विष पाजले व त्यांच्या अंगावर विष ओतले. दोघांनाही तातडीने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. नंतर त्यांना यवतमाळ येथील स्व.वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी ८़३० च्या सुमारास बंडू राठोड यांचा मृत्यू झाला तर बुधवारी यशोदाबाई यांचा मृत्यू झाला. सिंदखेड पोलिसांत याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध बुधवारी मध्यरात्री खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. गुरुवारी खंडू राठोड, राजेश राठोड या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी दिली.
भावकीत नेहमीच उडायचे खटके
माहूर तालुक्यातील जुनापाणी येथील बंडू मिसू राठोड यांना जुनापाणी येथे वडिलोपार्जित ५ एकर व वाई बाजार येथे मेहनतीच्या जोरावर घेतलेली ४ एकर, अशी एकूण ९ एकर जमीन आहे. त्या जमिनीवर खंडू मिसू राठोड यांचा डोळा होता. समसमान हिस्सा वाटून देण्याचे कारण पुढे करून भावकीत नेहमीच खटके उडत असत. त्यावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी समाजातील पंचांसमक्ष बैठकही झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही.