'मी विष पिले, शेतात हाय...'; मुलाच्या फोननंतर आईने हंबरडा फोडत शेताकडे घेतली धाव
By श्रीनिवास भोसले | Published: April 20, 2023 06:55 PM2023-04-20T18:55:57+5:302023-04-20T18:56:14+5:30
आईने हंबरडा फोडत शेताकडे धाव घेतली; एकतर्फी प्रेम की कर्ज, कारण कळेना?
हदगाव (जि. नांदेड) : आई मी विष पिले असून थोड्या वेळात मरणार आहे... असे मोबाइलवर आईला सांगून एकुलत्या एक मुलाने शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन केले. उपचारादरम्यान, १९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. काशीनाथ पांडुरंग पवार (वय २१) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत्यूचे कारण कळाले नाही. मात्र एकतर्फी प्रेम प्रकरणातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता काही जणांनी व्यक्त केली.
हदगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबाळा येथील काशिनाथ पांडुरंग पवार या तरुणाने १७ एप्रिल रोजी स्वतःच्या शेतामधील आखाड्यावर कीटकनाशक प्राशन केले. उपचारासाठी त्याला हदगाव व नंतर नांदेड येथे दाखल केले. आई, वडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र १९ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मनाने अतिशय चांगला व सुसंस्कृत असलेला काशीनाथ हा अनेक दिवसापासून वाकोडे यांच्या ट्रॅक्टरच्या एजन्सीवर काम करीत होता. नेमकी आत्महत्या कशासाठी केली, हे कोणी सांगायला तयार नाही. मात्र काहींनी एका मुलीशी झालेल्या एकतर्फी प्रेम प्रकरणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले. काशीनाथचे दहाव्या वर्गापर्यंत पंचशील शाळेमध्ये शिक्षण झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. येथेच त्याचे प्रेम प्रकरण चालू झाले, अशी माहिती मिळाली.
आईने हंबरडा फोडत शेताकडे धाव घेतली
कीटकनाशक प्राशन करण्यापूर्वी काशीनाथने स्वतः आईला फोन करून सांगितले, आई मी थोड्या वेळाने मरणार आहे. मी वीष प्राशन केले आहे. मी शेतामध्ये आहे... असे ऐकताच आईने हंबरडा फोडत शेताकडे धाव घेतली. अर्ध्या अर्ध्या संपलेल्या बॉटल एकत्र करून ठेवलेले विष त्याने प्राशन केले. दरम्यान, शेतीवर उपजीविका भागू शकत नाही. त्यामुळे स्वतः हदगावमध्ये एका ट्रॅक्टर कंपनीच्या एजन्सीवर काम सुरू केले. सात एकर शेती असून नावालाच होती. कारण शेतीवरचे कर्ज फिटत नव्हते. त्यामुळे सुद्धा त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असेही बोलले जात आहे.