'14 किमीवर माझी शेती आहे, कोविड सेंटरसाठी विनामोबदला द्यायला तयार'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 05:24 PM2021-04-20T17:24:53+5:302021-04-20T17:25:59+5:30
नांदेड शहरापासून 14 किमी अंतरावर स्वप्नील सूर्यवंशी यांची शेती आहे. आपली ही शेती आपण प्रशासनाला कोविड सेंटरसाठी विना मोबदला देण्यास तयार असल्याचं स्वप्नील यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
मुंबई - राज्यात कोविड 19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जास्तीत जास्त कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुका स्तरावर आणि प्रमुख गावांमध्येही कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनीही याकामी पुढाकार घेतला आहे. आता, एका शेतकऱ्याने आपली शेती कोविड सेंटरसाठी प्रशासनाला देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
नांदेड शहरापासून 14 किमी अंतरावर स्वप्नील सूर्यवंशी यांची शेती आहे. आपली ही शेती आपण प्रशासनाला कोविड सेंटरसाठी विना मोबदला देण्यास तयार असल्याचं स्वप्नील यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे. तसेच, आपल्या ट्वटिमध्ये काही स्थानिक मीडिया, पालकमंत्री अशोक चव्हाण आणि संबंधितांना त्यांनी टॅग केलं आहे. स्वप्नील हे नांदेश शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्या निर्णयाचं कौतुक केलंय. तसेच, 3 हजारांपेक्षा अधिक युजर्संनेही हे ट्विट लाईक केलं असून 300 पेक्षा जास्त रिट्वटि आहेत.
नांदेड शहरापासून १४ की.मी. अंतरावर माझी शेती आहे प्रशासनाला covid-सेंटर उभे करायचे असेल तर विना मोबादला मी माझी शेती वापरायला द्यायला तयार आहे 🙏@InfoNanded@nwmcnanded@NandedPolice@sggsietnanded@AshokChavanINC@CMOMaharashtra@shrikant_bhosle@anil010374@prash_dhumal
— Swapnil Suryawanshi (@lucky_swapnil) April 19, 2021
दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून राज्यात दरदिवसाल 50 ते 60 हजार बाधित आढळून येत आहेत. त्यातच, ऑक्सिजन, रेमेडीसीवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
राज्यात कडक लॉकडाऊनची शक्यता
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुन्हा एकदा लॉकडाऊन बाबत मोठे विधान केले आहे. राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत. कडक निर्बंध असतानाही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसून रुग्णसंख्या वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीर राज्य सरकार आज कडक लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात 15 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे म्हटले आहे.