माझ्यासाठी काम केले त्यांच्याच पाठीशी राहणार; चिखलीकरांचा रोष कोणावर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 06:59 PM2019-06-11T18:59:20+5:302019-06-11T19:03:12+5:30
भाजपातही शह-काटशहचे राजकारण जोरात
नांदेड : लोकसभा निवडणुकीत धक्कादायक विजयाची नोंद केलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सत्काराचे जंगी कार्यक्रम सध्या मतदारसंघात सुरू आहेत. दरम्यान, भाजपातही सध्या शह-काटशहचे राजकारण रंगत असल्याचे दिसून येते. देगलूर येथे नुकत्याच झालेल्या सत्कार सोहळ्यात चिखलीकर यांनी ‘माझ्यासाठी ज्यांनी काम केले त्यांच्यासाठीच काम करणार’ असे स्पष्ट केले. त्यामुळे खा. चिखलीकरांचा रोष नेमका कोणाविरुद्ध याचीच चर्चा सध्या सुरू आहे.
खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा येथील नागेश्वर मंदिरात जंगी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर होते. यावेळी आ. सुभाष साबणे, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, जि. प. सदस्या मीनल पाटील खतगावकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, श्यामसुंदर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलताना आ. रातोळीकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेच्या सर्व नऊ जागा जिंकायच्या आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
या सत्काराला उत्तर देताना चिखलीकर यांनी मतदारांचे ऋण व्यक्त केले. जनतेने भरभरुन प्रेम दिल्याचे सांगत माझ्या विजयामुळे कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे आज मी जास्त काही बोलत नाही. कारण खरे बोललो तर आजच्या दिवशी ते बरे वाटणार नाही, असे सांगत ज्यांनी लोकसभा निवडणुकीत माझ्यासाठी काम केले त्यांच्याच बाजूने खंबीरपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चिखलीकर यांच्या या वक्तव्यानंतर लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांचे काम पक्षातील लोकांनी केले नाही की मित्रपक्षातील याची कुजबूज सुरू झाली. विशेष म्हणजे, चिखलीकर यांनी हे वक्तव्य केले त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, मीनल पाटील खतगावकर आणि शिवसेना आ. सुभाष साबणे हे उपस्थित होते. त्यामुळे चिखलीकरांचा रोष नेमका कोणावर? हे काहीच स्पष्ट झाले नाही.
रातोळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व नऊ जागा जिंकण्याचा मनोदय व्यक्त केल्यानंतर खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनीही रातोळीकरांचे हे वाक्य पुढे घेवून जात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याची आवश्यकता असताना त्यांनी दिलेला सूचक इशारा पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याचेच दाखवून देते. दरम्यान, या कार्यक्रमात भाजपा शहराध्यक्ष अशोक गंदपवार, तालुकाध्यक्ष शिवकुमार देवाडे यांना मान देण्यात आला नसल्याने या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी खासदारांचा सत्कार करुन व्यासपीठावरुन काढता पाय घेतला. दरम्यान या कार्यक्रमाला भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.