तेव्हा युती केली नसती तर भाजपचे १४४ आमदार असते : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 07:32 PM2021-10-04T19:32:04+5:302021-10-04T19:33:10+5:30
Chandrakant Patil News : आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या फक्त पाच जागा आल्या असत्या
नांदेड -विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा आणि शिवसेना युतीला निवडून दिले होते. तेव्हा युती केली नसती तर एकट्या भाजपचे १४४ आमदार निवडून आले असते तर शिवसेना केवळ ५ जागांवर राहिली असती असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी लगावला. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला याप्रसंगी ते बोलत होते.
नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात पुन्हा एकदा जोरदार टीकाटिपणी सुरु झाली आहे. यातच शिवसेनेच्या माजी आमदारालाच भाजपने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली. यामुळे आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. याच कार्यक्रमा दरम्यान पाटील यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
ते म्हणाले, विधानसभेत जनतेने युतीला निवडून दिले होते. महाविकास आघाडीला नव्हते. युती केली नसती तर भाजपाचे १४४ आमदार निवडून आले असते. युतीत शिवसेनेने धोका दिल्याने भाजपचे २० उमेदवार पडले. भाजपने धोका दिला असता तर सेनेच्या फक्त पाच जागा आल्या असत्या असेही पाटील म्हणाले.