झाडांना ठोकसाल खिळा, तर खावी लागेल जेलची हवा
By शिवराज बिचेवार | Published: August 22, 2023 04:40 PM2023-08-22T16:40:06+5:302023-08-22T16:40:32+5:30
शहरात विनापरवानगी लावण्यात येणाऱ्या बॅनरच्या विरोधात मनपाने माेहिमच सुरु केली आहे.
नांदेड- शहरात विनापरवानगी वाट्टेल त्या ठिकाणी बॅनर्स, होर्डींग्ज लावून विद्रुपीकरण करण्यात येत आहे. त्यातच महापालिकेने रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचाही जाहिरातीसाठी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे झाडाला खिळा ठोकून जाहिराती करणार्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. लावण्यात आलेले असे बॅनर, जाहिराती काढून घेण्यासाठी तीन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
शहरात विनापरवानगी लावण्यात येणार्या बॅनरच्या विरोधात मनपाने माेहिमच सुरु केली आहे. त्या अंतर्गत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच परवानगी घेवून बॅनर लावावे लागणार आहेत. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणाला बर्याच प्रमाणात चाप बसला आहे. परंतु रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचांही फुकटच्या जाहिराती करण्यासाठी विक्रेते वापर करीत आहेत. दुकानासमोरील झाडाला खिळे ठोकून त्यावर जाहिरात लावण्यात येत आहेत. त्यामुळे झाडांना ईजा होत असून शहराच्या विद्रुपीकरणातही भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेने अशाप्रकारे झाडावर जाहिरात करणार्यांना आता तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. येत्या तीन दिवसात अशाप्रकारच्या सर्व जाहिराती आणि खिळे न काढल्यास संबधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.