"खोदायचे असेल तर आणखी खालून खोदा, सर्वत्र 'बुद्ध' सापडतील": चंद्रशेखर आझाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 01:09 PM2022-05-30T13:09:53+5:302022-05-30T13:17:00+5:30
भाजपाने हे थांबवलं नाही तर आम्ही देखील आमच्या बौद्ध विहारांसाठी न्यायालयात जाऊ
नांदेड - ज्ञानव्यापी मशीदवरून सध्या वाद सुरू आहे. परंतु, जनतेच्या मूळ प्रश्नावरून लोकांचे लक्ष वळविण्याची ही भाजपाची खेळी असल्याचा आरोप आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी. तसेच भाजपाने हे प्रकरण थांबवलं नाही तर आम्ही देखील आमच्या बौद्ध विहारांसाठी न्यायालयात जाऊ, तिरुपती बालाजी, शिरपूरधामवर दावा करून, असा इशाराही यावेळी आझाद यांनी दिला. ते नांदेड येथीलं पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना चंद्रशेखर आझाद म्हणाले, सम्राट अशोकाने देशभरात 84 हजार बुद्ध विहार बांधले होते. आज देशातील अनेक धार्मिक स्थळे बौद्ध विहारावर आहेत. भाजपाने हे प्रकरण थांबवलं नाही तर आम्ही देखील आमच्या बुद्ध विहारासाठी न्यायालयात जाऊ. तिरुपती बालाजी आणि झारखंड येथील शिरपूरधाम बुद्ध विहारावर बांधले गेले आहेत, त्यावर देखील आम्ही दावा करू अशा इशारा आझाद यांनी दिला. तसेच खोदकामच करायच असेल तर थोडं खालून करा इथे बुद्ध सापडतील, असेही ते म्हणाले.
महापालिका निवडणुकीत उतरणार
भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीने महाराष्ट्र राज्यात देखील काम सुरू केल असून संघटन मजबूत आहे . तेव्हा येत्या महापालिका निवडणुकीत आझाद समाज पार्टी देखील उतरणार असल्याचे चंद्रशेखर आझाद स्पष्ट केले. समविचारी पक्षांसोबत युती करायची की नाही हे त्यावेळी पाहू पण आझाद समाज पार्टीने महापालिका निवडणुकीची तयारी केल्याचे चंद्रशेखर आझाद म्हणाले.