कंधारात ऐतिहासिक कलाकुसरीची मूर्तीशिल्प देखभाली अभावी दुर्लक्षित;  अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:40 PM2018-01-31T18:40:52+5:302018-01-31T19:09:12+5:30

बाराशे वर्षांचा इतिहास असलेले नानाविध शेकडो मूर्तीशिल्पांना जतन करण्यासाठी शासन व पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे सौंदर्य अन् बारकावे पुसटसे होत असल्याची बाब समोर आली आहे़ भुईकोट किल्ला संवर्धनासाठी जसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसाच मूर्तीशिल्पे जतन करण्यासाठी अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची निर्मिती करावी, अशी मागणी पर्यटक, इतिहासप्रेमींतून केली जात आहे़ 

Ignored wanting to maintain the historic Craftsmanship of Kandahar; Needs to install the latest museum | कंधारात ऐतिहासिक कलाकुसरीची मूर्तीशिल्प देखभाली अभावी दुर्लक्षित;  अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची गरज

कंधारात ऐतिहासिक कलाकुसरीची मूर्तीशिल्प देखभाली अभावी दुर्लक्षित;  अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची गरज

googlenewsNext

- प्रा.गंगाधर तोगरे

कंधार (नांदेड ): बाराशे वर्षांचा इतिहास असलेले नानाविध शेकडो मूर्तीशिल्पांना जतन करण्यासाठी शासन व पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे सौंदर्य अन् बारकावे पुसटसे होत असल्याची बाब समोर आली आहे़ भुईकोट किल्ला संवर्धनासाठी जसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसाच मूर्तीशिल्पे जतन करण्यासाठी अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची निर्मिती करावी, अशी मागणी पर्यटक, इतिहासप्रेमींतून केली जात आहे़ 

आठव्या शतकापासून घडलेल्या अनेक स्मृती राष्ट्रकुटकालीन कंधार आपल्या अंगाखांद्यावर खेळवते आहे़ शहराला मंदिर, मूर्तीचा समृद्ध वारसा आहे़ कृष्णेश्वर मंदिर, क्षेत्रपाल मंदिर, संगरेश्वर मंदिर, बंकेश्वर मंदिर, मंडलसिद्धी विनायक मंदिर, जैन मंदिर, कालप्रिय नाथमंदिर आदी मंदिराने वैभव प्राप्तप्त करून दिले़ मात्र काळाच्या ओघात अनेक मंदिरे नष्ट झाली़ मोजकीच आता कशीतरी तग धरून आहेत़ त्यात जैन मंदिर, बौद्ध मूर्ती, द्वादशभूजा देवी, अष्टभुजा देवी मूर्ती सतर्कतेने चांगल्या स्थितीत पहायला मिळतात़ मात्र शेकडो मूर्तीशिल्पे अडगळीला असल्याचे दिसते़

मूर्तीशिल्पे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात़ खोदकाम, नांगरटी करताना ते प्रकर्षाने  समोर येतात़ त्याचे जतन करण्याचेच मोठे आव्हान आजही कायम आहे़ महादेव, नंदी, पार्वती, कौमारी, जैन, पद्मपाणी, वैष्णवी, महिषासूर मर्दिनी, चामुंडा, लज्जागौरी, महाकालीन, अवलोकीतेश्वर, क्षेत्रपाल भैरव, चंद्रशिळा, हत्ती, गणेश आदी मूर्तीशिल्पे विखुरलेले व अडगळीत आहेत. वादळवारा, ऊन, पाऊस, गारठा आदीचे आघात सहन करत मूर्तीशिल्पे पर्यटकांना आकर्षित करतात़, परंतु बाराशे वर्षांचा समृद्ध वारसा दुर्लक्षित होत असल्याने त्याचे कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे बारकावे पुसटते होत असल्याची भीती पर्यटकांतून व्यक्त होत आहे़

वेरूळ-अजिंठा येथे असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभवाच्या तोडीचा समृद्ध वारसा, कला साधना, अप्रतिम मूर्तीशिल्पे कंधारचे जतन करणे काळाची गरज आहे़ भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी शासन-पुरातत्त्व विभागाने दमदार पावले टाकली आहेत़ तशीच पावले मूर्ती जतन, संवर्धनासाठी टाकावीत, अन्यथा अप्रतिम-कलासाधना काळाच्या ओघात पुसटशा होवून सौंदर्य नष्ट होण्याची भीती आहे़ 

माजी खा़भाई डॉक़ेशवराव धोंडगे व माजी आ़भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी मन्याड खोर्‍याचा मंदिर-मूर्तीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची अनेकवेळा शासनाकडे मागणी केली़ बहाद्दरपुरा येथे पाटबंधारे विभागाकडून राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला़ त्यामुळे अनेक मूर्तीचे योग्य जतन होण्यास मोठी मदत झाली़ मानार नदी काठावर शांतीघाट परिसर, बगीचा, मंदिर, राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालय, द्वादशभूजा देवी लोकाश्रय मंडप आदींना पर्यटक त्यामुळे भेटी देतात़ विखुरलेले अनेक मूर्तीशिल्पे एकत्रित करून, भंगलेले मूर्तीशिल्पे एकत्रित करावीत, ज्यात किल्ल्यातील गणेशमूर्ती, नंदी, क्षेत्रपाल आदी उघड्यावर पडलेले आहेत़ त्या कलावैभवाला अद्ययावत वस्तूसंग्रहालय बहाद्दरपुरा येथेच जतन करण्यासाठी करावे़ सद्य:स्थितीत असलेल्या राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालयाची व्यापकता वाढवावी.

Web Title: Ignored wanting to maintain the historic Craftsmanship of Kandahar; Needs to install the latest museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.