ग्रामीण भागात अवैध दारु विक्री जोरात; ३२ जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 01:44 PM2020-05-06T13:44:54+5:302020-05-06T13:46:30+5:30
लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी मद्यविक्री बंद आहे़ अशा काळात अवैध गावठी दारु विक्रेत्यांनी आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे़
नांदेड : लॉकडाऊन काळात नांदेड शहरासह ग्रामीण भागात अवैध दारु विक्रीचे पेव फुटले आहे़ अनेक वाड्या-तांड्यावर बिनबोभाट अवैध दारु विक्री केली जात असून, यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे़ या विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकून ३२ जणांना अटक केली आहे़
लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी मद्यविक्री बंद आहे़ अशा काळात अवैध गावठी दारु विक्रेत्यांनी आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे़ शहरातील अनेक भागांसह ग्रामीण भागातही त्यामुळेच हातभट्टी दारुची मोठ्याप्रमाणात विक्री सुरु असल्याचे चित्र आहे़ नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे़ सोमवारी मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा, उमाटवाडी तसेच नांदेड तालुक्यातील वाजेगाव व पुणेगाव येथे अवैध हातभट्टी दारु अड्यावर धाडी टाकून पथकाने ३२ आरोपींना अटक केली़ या आरोपींकडून २० दुचाकी वाहने व एका चारचाकी वाहनासह हातभट्टीची ५९० लिटर दारु जप्त करण्यात आली आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस़एसख़ंडेराय, एस़एम़बोधमवाड, पी़ए़मुळे, पी़टी़शेख, मोहम्मद रफी, अमोल शिंदे आदींनी ही कारवाई केली़
एकीकडे कारवाई दुसरीकडे विक्री सुरुच
लॉकडाऊनच्या काळात हातभट्टी दारु अड्डे मात्र जोमात असल्याचे चित्र आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातही ही दारु सर्रासपणे उपलब्ध होत आहे़ या विरोधात नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया येवू लागल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाईचा बडगा उगारते़ मात्र एकीकडे कारवाई सुरु असताना जिल्ह्याच्या अनेक भागात हातभट्टी दारु सर्रासपणे विकली जात असल्याचे चित्र असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही अवैध विक्री रोखण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे़
बनावट दारुचेही पीक फोफावले
लॉकडाऊनमुळे १४ मार्चपासून जिल्ह्यातील वाईन शॉप, परमीट रुमसह देशी दारुची दुकान बंद आहेत़ मात्र त्यानंतरही चोरट्या मार्गाने दारु विक्री शहर आणि जिल्ह्यात येत असून, चढ्या भावाने ती घरपोच पोहोचविली जात असल्याच्या तक्रारी आहेत़ विशेष म्हणजे हीच संधी साधत बनावट दारुचेही पेव फुटले आहे़ ही बनावट दारु जास्त प्रमाणात सेवन केल्यास जीवाला धोका निर्माण होवू शकतो़ त्यामुळे प्रशासनाने या विरोधात व्यापक मोहीम राबविण्याची मागणी होत आहे़ सद्य:स्थितीत छुप्या मार्गाने चौपट किमतीत देशी-विदेशी मद्याची विक्री होत असल्याची चर्चा आहे़