नांदेडमध्ये महामार्ग पोलिसांकडून अवैध वसुली; ६ पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 07:00 PM2019-08-12T19:00:16+5:302019-08-12T19:02:43+5:30
अर्धापूर येथील महामार्ग पथकाकडून मोठ्या प्रमाणात वसुलीची तक्रार
नांदेड : नांदेड-अर्धापूर रस्त्यावर महामार्ग सुरक्षा पथकाच्या अवैध वसुलीबाबत होत असलेल्या वाढत्या तक्रारीनंतर महामार्गाच्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अर्धापूर येथील महामार्ग पथकाकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू असल्याची तक्रार महामार्ग अप्पर पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. याबाबत तक्रारकर्ते सुभाषशिष कामेवार यांनी १५ आॅगस्ट रोजी आत्मदहनाचाही इशारा दिला होता. कामेवार यांच्या तक्रारीची दखल घेत महामार्ग सुरक्षा पथकाच्या अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यात विजय सूर्यवंशी, गणेश लोसरवार, गोविंद मुंडे, ईश्वर राठोड, आबाजी खोमणे, दीपक जाधव या सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात महामार्ग पोलिसांकडून वसुलीबाबत अनेक तक्रारी आहेत. याच तक्रारीची दखल घेतल्याचे सदर निलंबन कारवाईवरून स्पष्ट होत आहे. महामार्ग पोलिसांच्या वसुलीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.