अवैध वाळू उपसा करणारी वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:56 AM2019-03-04T00:56:33+5:302019-03-04T00:56:58+5:30
लोहा तालुक्यातील शेलवाडी व पिंपरणवाडी या गावांच्या शिवारातील नदी-नाल्यांच्या पात्रातून अवैध रेतीउपसा करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड : लोहा तालुक्यातील शेलवाडी व पिंपरणवाडी या गावांच्या शिवारातील नदी-नाल्यांच्या पात्रातून अवैध रेतीउपसा करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडील ३ जेसीबी व रेतीसह ५ ट्रॅक्टर असा एकूण १ कोटी १५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात रेती लिलाव झाले नसताना मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. या रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरुन सहा. पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे, उपनिरीक्षक विनायक शेळके, सदानंद वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३ मार्च रोजी सोनखेड पोलीस ठाणे हद्दीत शेलवाडी व पिंपरणवाडी या गावच्या परिसरात असलेल्या नदी-नाल्याच्या पात्रातून अवैध रेती वाहतूक सुरू असताना धाड टाकली.
जेसीबीद्वारे येथे उत्खनन करुन मोठ्या प्रमाणात विनापरवाना रेती नेली जात होती. या धाडीत तीन जेसीबींसह ५ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जसवंतसिंघ शाहू, भानुदास वडजे, दशरथ जांभळेकर, दारासिंग राठोड, राजू पांगरीकर, बालाजी सातपुते, विजय आडे, घुंगरुसिंग टाक, केंद्रे आदींनी केली आहे.