मी रिटायर्ड, श्रीजयाची इच्छा असल्यास भोकरच्या रिंगणात; अमिता चव्हाण यांचं सूचक विधान
By शिवराज बिचेवार | Published: February 17, 2024 05:24 PM2024-02-17T17:24:21+5:302024-02-17T17:24:51+5:30
भोकर विधानसभा मतदार संघ हा दिवंगत गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. याच मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, अमिता चव्हाण यांनी विधानसभेत नेतृत्व केले.
नांदेड - माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आता त्यांची भाजपाकडून राज्यसभेवर निवड पक्की आहे. त्यामुळे भोकर विधानसभा मतदार संघात आगामी चेहरा कोण? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. त्यावर माजी आमदार अमिताताई चव्हाण यांना विचारले असता, मी आता रिटायर्ड झाले आहे. भोकर मतदार संघावर आम्ही कोणताही उमेदवार लादणार नाही. जनतेची इच्छा असल्यास श्रीजया भोकर विधानसभेच्या रिंगणात उतरेल असे सूचक विधान केले. त्यामुळे भोकर मतदार संघातून श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी पक्की उमेदवारी मानली जात आहे.
भोकर विधानसभा मतदार संघ हा दिवंगत गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. याच मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, अमिता चव्हाण यांनी विधानसभेत नेतृत्व केले. त्या मतदार संघात चव्हाण कुटुंबियांना माननारा मोठा वर्ग आहे. त्यात आता अशोकराव चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत दिल्ली गाठली आहे. त्यामुळे भोकरमध्ये चव्हाण कुटुंबियातून कोण? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावर अमिता चव्हाण यांनी शनिवारी सुचक विधान केले. त्या म्हणाल्या, श्रीजयाची इच्छा असल्यास काही हरकत नाही. परंतु मतदार संघातील जनतेच्या मनात काय आहे याचाही विचार महत्त्वाचा आहे. लोकांना जर श्रीजयाचे नेतृत्व मान्य असेल तर ठिक आहे. पण मी आता निवडणूक लढविणार नाही.
मी रिटायर झाले असून घरी आलेल्यांच्या चहा-पाण्यासाठी कुणी नको का? चव्हाण भाजपात जाणार याबाबत कुटुंबाला माहिती होती का? या प्रश्नावर अमिता चव्हाण म्हणाल्या, तुमच्याकडे बातम्या येत होत्या, तेव्हापासूनच आम्ही घरात चर्चा करीत होतो. आता केवळ त्यावर पूर्णविराम बसला आहे. अशी मिश्कील उत्तर दिले. अशोकराव चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर आपल्या सोबत येण्यासाठी कुणालाही सांगितले नाही. ज्यांना काँग्रेसमध्ये राहायचे त्यांनी तिथे राहावे. ज्यांना चव्हाणांसोबत यायचे त्यांनी यावे. असे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. नांदेडच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नांदेडकर जनता त्यांच्या निर्णयाच्या बाजूने ठामपणे उभी असल्याचे दिसते आहे, असा विश्वासही अमिता चव्हाण यांनी व्यक्त केला.