योजनांची योग्य अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:30 AM2018-03-10T00:30:41+5:302018-03-10T00:30:56+5:30
राज्य शासन सफाई कर्मचा-यांसाठीच्या अनेक योजना राबवित असते. या योजनांची योग्य अंमलबजावणी महापालिकेने करावी असे आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी शुक्रवारी दिले़ महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्य शासन सफाई कर्मचा-यांसाठीच्या अनेक योजना राबवित असते. या योजनांची योग्य अंमलबजावणी महापालिकेने करावी असे आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी शुक्रवारी दिले़ महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते़
दरम्यान, सकाळी त्यांनी महापालिका आयुक्त तसेच विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेतली़ यावेळी कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली़ बैठकीनंतर बोलताना पवार यांनी सफाई कर्मचा-यांसाठी खूप काही करणे गरजेचे असल्याचे सांगितले़
नांदेड शहराची एकूण लोकसंख्या आणि सफाई कामगारांची संख्या पाहता यात मोठी तफावत आहे़ शहराला २ हजार ५०० सफाई कामगारांची गरज असताना केवळ ६३० कर्मचारी आहेत़
सफाई कामगाराला दिले जाणारे आवश्यक साहित्यही पुरवले जात नाहीत़ लाड-पागे समितीच्या शिफारशीही लागू केल्या गेल्या नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले़ सफाई कामगारांसाठीच्या घरांचा प्रश्नही रखडला आहे़ शहरात सफाई कामगारांना महापालिकेने घरे दिले नाहीत़ काही ठिकाणी जागा दिल्या असल्या तरी घरांचा प्रश्न कायम आहे़
तसेच सफाई कामगारांना सुटी दिली जात नाही, अत्यावश्यक बाब असली तरी सुटीच्या दिवशीचे वेतन देणे आवश्यक आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत २५ वर्षे सेवा झालेल्या सफाई कर्मचा-यांना आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना घरे देण्याची योजना आहे़ या योजनेचीही अंमलबजावणी शहरात झालीच नाही़ महापालिकेच्या एकूण उत्पन्नातील ५ टक्के निधी हा कर्मचा-यांवर खर्च करण्याची तरतूद असताना तो खर्च झाला नाही़ या सर्व प्रश्नांवर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे समितीचे अध्यक्ष पवार यांनी सांगितले़
इतकेच नव्हे,तर तीन महिन्यानंतर योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी परत नांदेडला येण्यासही सांगितले आहे़ विविध कामगार संघटनांशीही चर्चा झाल्याचे पवार म्हणाले़
समितीचा हा अहवाल शासनाला पाठविला जाणार...
१० वर्षे कार्यरत नसलेली ही समिती सरकारने गतवर्षी कार्यान्वित केली असून सफाई कर्मचाºयांच्या योजनांचा आढावा घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जात असल्याचे समिती अध्यक्ष पवार यांनी सांगितले़ यावेळी आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संभाजी वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते नरोत्तम चव्हाण, अॅड़ कबीर बिवाल आदींची उपस्थिती होती़