एका राज्यात तोफा डागल्या जाताहेत अन् प्रधानमंत्री आरत्या करत फिरताहेत: संजय राऊत
By अविनाश पाईकराव | Published: September 12, 2024 04:25 PM2024-09-12T16:25:27+5:302024-09-12T16:26:57+5:30
चीनची घुसखोरी, मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेश येथील प्रश्नावर प्रधानमंत्री, गृहमंत्री का बोलत नाहीत : संजय राऊत
नांदेड: चीनने भारताचा चार हजार किलोमीटर भाग गिळकृंत केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्येही ६५ कि.मी. आतपर्यंत चीनच्या सैन्याने घुसखोरी केली आहे. मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असताना हे सरकार राजकारणात अडकून पडले असून देशाचे पंतप्रधान आरत्या करत फिरत आहेत, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
लोहा येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते गुरुवारी नांदेड येथे आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन याबाबत बोलत असले तरी आम्ही महिनाभरापासून हा विषय मांडत आहोत. मणिपूर हातातून गेले आहे. लडाखचा अर्धा भाग चीनने ताब्यात घेतला असून तेथे गावं वसवले आहे. या देशाला संरक्षण मंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री आहेत का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मणिपूरची जनता सुद्धा देशाची नागरिक आहे. लडाखचे सोनम वांगचू हे काही प्रश्न घेऊन लडाखपासून दिल्लीला चालत निघाले आहेत. त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण या प्रश्नावर भाजपाचे नेते, प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री बोलणार नाहीत. तर ते आमच्यावर बोलतील. आमच्यावर टीका करतील. मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेश येथील प्रश्नावर ते का बोलत नाहीत. आमचे ५६ इंची सरकार गप्प बसले असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली.
एका राज्यात तोफा डागल्या जाताहेत
देशात फाळणीच्या वेळी जी परिस्थिती होती. त्यापेक्षा भयंकर परिस्थिती मणिपूर आसाममध्ये निर्माण झालेली आहे. एका राज्यात मिसाईल चालवले जाताहेत, ड्रोन हल्ले केले जाताहेत. तोफा डागल्या जाताहेत. राज्यपाल पळून जाताहेत. १९६१ ला जेव्हा चीनसोबत युद्ध झाले तेव्हा ईशान्येकडील राज्यातील सरकार पळून गेले. त्याचप्रमाणे आसाममध्ये देखील राज्यपाल आणि सरकार पळून गेले असल्याचेही खासदार संजय राऊत म्हणाले.