ऐन दिवाळीत बळीराजा आर्थिक संकटात; हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 04:14 PM2024-11-01T16:14:55+5:302024-11-01T16:16:24+5:30

बाहेर निवडणुकीची चर्चा पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणार कोण ?

In Diwali time farmers are in financial crisis; Purchase of agricultural produce at less than guaranteed price | ऐन दिवाळीत बळीराजा आर्थिक संकटात; हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी

ऐन दिवाळीत बळीराजा आर्थिक संकटात; हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी

नांदेड : दरवर्षी शेतकऱ्यांचा शेती माल हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा केली जाते. हमीभाव ठरवलाही जातो. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ७९२ ते १३९२ रुपये प्रति क्विंटल कमी दराने सोयाबीन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने सरकारला शेतकऱ्याच्या गळ्यातील फास हटवायचा नाही का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणूक व दिवाळी सणाच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने गुरुवारी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. मागच्या काही वर्षांपासून शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या कचाट्यात अडकला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करत शेतकरी शेती माल पिकविण्यासाठी धडपडतोय. सरकारकडून अनेक योजनांच्या घोषणांचा गरज नसताना पाऊस पाडला जात आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे तसा भाव देण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसून येत नाही. हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रही उभारण्यात आले. मात्र एकाही हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना आपला माल विक्री करता आला नाही. सध्या खर्च अधिक आणि उत्पादन कमी झाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. अशी खंतही शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.

हमीभाव केवळ नावालाच
केंद्र सरकारने सोयाबीनला यावर्षीच्या चालू खरीप हंगामासाठी ४८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. नांदेडच्याबाजार समितीत गुरुवारी ३९०० रुपये सरासरी दराने सोयाबीनची विक्री झाली. त्यामुळे हमी भाव केवळ नावालाच दिसून येत आहे.
व्यंकटेश कदम, शेतकरी

एकही रूपया शिल्लक राहत नाही
शेतकऱ्याला ऐकरी सोयाबीनचा खर्च सरासरी अठरा ते वीस हजार रूपये ऐवढा येतो. अन् उत्पनही वीस हजार रूपयांच्या आसपास होत आहे. यामध्ये शेतकऱ्याने केलेल्या स्वता मेहनतीचा मोबदला पकडला तर खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीतील उत्पन्नातून एक रूपयाही शिल्लक राहत नसल्याने चांगला भाव मिळणे आवश्यक आहे.
- विठ्ठल खांडरे, शेतकरी

शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी हताश
मागच्या काही वर्षापासून शेतकऱ्याच्या कोणत्याचा मालाल चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. मेहनतीच्या तुलने मोबदला मिळत नसल्याने निराश होवून कित्येक शेतकऱ्यांनी गळफास लावून मृत्यूला कवटाळले. त्यामुळे सरकारने वायफळ घोषणा राबविण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा. तरच शेतकरी आत्महत्या थांबतील.
- आनंदराव शिंदे, शेतकरी

सोयाबीनचा सरासरी एकरी खर्च
नांगरणी- १०००
वखरणी-८००
सोयाबीन बॅग- ३२००
खत-१५००
पेरणी- १०००
तणनाशक- १५००
औषध फवारणी- ४०००
सोयाबीन काढणी- ३५००
मळणी यंत्र- १५००
माल वाहतूक- ५००
एकुण खर्च- १८५००
उत्पन्न- एकरी ५ क्विंटल, भाव- ३९००, एकुण उत्पन्न- १९५००

Web Title: In Diwali time farmers are in financial crisis; Purchase of agricultural produce at less than guaranteed price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.