भाविकांवर काळाचा घाला; एकमेकांना वाचविताना पाच जणांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:42 AM2022-08-22T11:42:58+5:302022-08-22T11:44:08+5:30
सर्वांचे दर्शन झाल्यानंतर कुटुंबातील पाच जण व एक महिला जेवणासाठी तलावकाठावर बसले होते.
कंधार (जि. नांदेड) :नांदेडच्या खुदबईनगरमधील भाविक शहरातील प्रसिद्ध बडी दर्गाहच्या दर्शनासाठी आले होते. एकमेकांना वाचविताना पाच भाविकांचा जगतुंग समुद्रात (तलावात) बुडून मृत्यू झाल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली.
२१ ऑगस्ट रोजी नांदेड येथील भाविक बडी दर्गाहच्या दर्शनासाठी आले होते. दुपारी तलावकाठावर बसून त्यांनी जेवण केले. प्लेट धुण्यासाठी एक जण काठावर गेला. त्यात पाय घसरून तलावात बुडत होता. त्याला वाचविण्यासाठी दुसरा प्रयत्न करताना तोही बुडू लागला. एकमेकांना काढताना पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतात मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार (४५ वर्ष), मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन (१५ वर्ष), सय्यद सोहेल सय्यद वाहिद (२० वर्ष), सय्यद नवीद सय्यद वाहिद (१५ वर्षे), मोहम्मद विखार (२३ वर्षे) यांचा समावेश आहे. मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार हे नांदेड येथे बेकरी व्यवसाय करत होते असे समजले. हे सर्व भाविक आपल्या नातेवाईक व कुटुंबासह हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम (बडी दर्गाह)च्या दर्शनासाठी आले होते.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वांचे दर्शन झाल्यानंतर मयत झालेले पाच व कुटुंबातील महिला जेवणासाठी तलावकाठावर बसले होते. पाचही जण जगतुंग तलावात बुडत असताना सोबत असलेल्या कुटुंबातील महिलेने पाहिले. ही माहिती दर्गाहमध्ये असलेल्या त्यांच्या इतर नातेवाइकांना दिली. माहिती कळताच स्थानिक लोकांनी तलावाकडे धाव घेत बुडत असलेल्या पाच जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तत्काळ त्यांना रुग्णवाहिका व ऑटोरिक्षातून ग्रामीण रुग्णालय कंधार येथे आणले. डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. शवविच्छेदन व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस करत आहेत. मोहम्मद अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली.
मयतांच्या नातेवाइकांची उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. घटनास्थळाला भेट दिली. ही घटना समजताच नवरंगपुरा येथील सरपंच वसंत निलावाड, शेरुभाई यांच्यासह गावकरी जमा झाले. पांडुरंग बामणवाड यांनी तलावातील मृतदेह बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयात उपनगराध्यक्ष मोहमद जफरोद्दीन, विक्रांत शिंदे, माजी उपनगराध्यक्ष बब्बर मोहमद आदींनी भेट देऊन नातेवाइकांना धीर दिला. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहेत.