गोदावरीत जलपर्णी, पाणी झाले हिरवे; शहरातील सांडपाणी नदीपात्रात
By प्रसाद आर्वीकर | Published: May 12, 2023 02:36 PM2023-05-12T14:36:24+5:302023-05-12T14:36:41+5:30
शहरालगत गोदावरी नदी असून, शहरातील सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते
नांदेड : शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीत सांडपाणी सोडले जात असून, या पाण्याने जलपर्णी वाढल्याने गोदावरी नदीच्या पाण्यावर हिरवी चादर पसरली असून, पाणी दूषित होऊ लागले आहे.
शहरालगत गोदावरी नदी असून, शहरातील सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पात्र दूषित होण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच गोदावरी पात्रातील हजारो मासे मरुन पडल्याची घटना घडली होती. त्याच वेळी नदीपात्रातील पाणी दूषित होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाकडून नदी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. नागरिकांकडे याबाबत जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे शहराजवळच नदीचे पात्र दूषित होत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. दरवर्षी गोदावरी नदीत जलपर्णी वाढते. यावर्षीही ही जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली असून, नदीचे पात्र हिरवेगार होत आहे. संपूर्ण नदीपात्रात हिरवी चादर पसरल्यासारखे दिसत आहे. जलपर्णी वाढल्याने पाण्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. शिवाय पाणी दूषित होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पर्यावरण तज्ञांनी नदीच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.