प्रसिद्ध उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घर आणि कार्यालयावर आयकरची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 05:03 PM2021-10-29T17:03:46+5:302021-10-29T17:06:09+5:30
Income tax raid on businessman subodh kakani: आज पहाटे केंद्रीय आयकर विभागाच्या जवळपास ४० कर्मचाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली
धर्माबाद ( नांदेड ) : धर्माबाद येथील प्रसिद्ध युवा उद्योजक सुबोध काकाणी यांचे घर, विविध कार्यालय व संस्थेवर आज पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान केंद्रीय आयकर विभागाने धाड ( Income tax raid on businessman subodh kakani ) टाकली. अत्यंत गोपनीयरित्या ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आज पहाटे केंद्रीय आयकर विभागाचे जवळपास ४० कर्मचाऱ्यांचे पथक हे दिल्लीवरुन थेट हैद्राबादला विमानाने उतरले. त्यानंतर खाजगी वाहनाने ते पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास धर्माबादला पोहोचले. येथे बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारिणमधील विश्वस्त संचालक तथा उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घरावर धाड टाकली. दरम्यान, काकाणी यांचे कार्यालय आणि संस्थेवर देखील एकाच वेळी पथकाने धाड टाकली. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली आहे. कारवाई कोणत्या कारणासाठी झाली ? यात नेमके काय निष्पन्न झाले ? यावर अधिकृतरीत्या अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.
कोण आहेत सुबोध काकाणी
धर्माबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय राजाराम काकाणी यांचे सुबोध हे नातू आहेत. सुबोध यांनी उद्योग, सहकार, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात राज्यस्तरावर अल्पवधीत नाव लौकिक मिळवला आहे.