नांदेड मनपात अपात्र ठेकेदार पुन्हा झाला पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:42 AM2018-06-08T00:42:49+5:302018-06-08T00:42:49+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ येथे गांधीनगरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत पात्र नसलेल्या एका ठेकेदारास पात्र ठरविल्याचा प्रकार पुढे आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ येथे गांधीनगरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत पात्र नसलेल्या एका ठेकेदारास पात्र ठरविल्याचा प्रकार पुढे आला आहे.
महापालिकेच्या दलित वस्ती निधीअंतर्गत होळी येथील पाणीपुरवठा कामात चोरीचे पाईप वापरल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकले होते. मात्र त्यानंतरही एका निविदा प्रक्रियेत ‘सोहेल’ पात्र ठरल्याचा प्रकार पुढे आला होता.
यावरुन मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर तरी प्रशासकीय पातळीवर पात्र ठेकेदाराला निविदा प्रक्रियेत सामावून घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. प्रभाग ४ मध्ये गांधीनगर भागात रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यासाठी ५१ लाख रुपयांचे निधी मंजूर होता. या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या पाच ठेकेदारामध्ये सुरज इंटरप्राईजेस नांदेड या ठेकेदारास केवळ ५० लाखापर्यंतची कामे करण्याचा परवाना आहे.
असे असतानाही सदर ठेकेदार महापालिकेच्या ५१ लाखांच्या निविदा प्रक्रियेत सहभागी झाला अन् तो पात्रही झाला आहे. पुढे या कामाच्या निविदा प्रक्रियेत सुरज इंटरप्राईजेस आणि मे. कामारीकर कंन्स्ट्रक्शन या दोन्ही ठेकेदाराचे दर समान आले होते.
त्यांना पुन्हा बंद लखोट्यात दर सादर करण्यास कळवले. त्यात मे. कामारीकर कन्स्ट्रक्शन हे पूर्वीच्या दरापेक्षा काम करण्यास तयार नव्हते. तर सुरज इंटरप्राईजेसनेही हे काम करण्यास तयार नसल्याचे महापालिकेला कळविले.
या निविदा प्रक्रियेत ऐनवेळी निविदा प्रक्रियेत माघार घेतल्याने सुरज इंटरप्राईजेस नांदेड यांची इमडी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर मे. कामारीकर कन्स्ट्रक्शनला हे काम देण्याचे आदेश देण्यात आले होते.
एकूणच पात्र नसलेल्या ठेकेदाराला महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरवून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच स्पर्धा निर्माण करण्यासाठी पात्र ठरविले जाण्याचा नवाच पायंडा मनपात सुरु झाला आहे.
या प्रकरणात नूतन आयुक्त लहुराज माळी आता काय भूमिका घेतील, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
---
संबंधित प्रकरणाची चौकशी करू- आयुक्त
प्रभाग क्रं. ४ मधील दलितवस्ती निधीतून रस्ते आणि नाली कामाच्या निवीदा प्रक्रियेतील अनियमीतते संदर्भात महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांच्याशी संपर्क साधला असता, निवीदा प्रक्रियेत अनियमीतता झाली असल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर निश्चीतपणे संबंधितावर कारवाई करण्यात येईल. असे आयुक्त माळी यांनी स्पष्ट केले आहे.