नांदेड येथील डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशक्षमतेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:42 AM2018-05-17T00:42:17+5:302018-05-17T00:42:17+5:30
कै़ डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत ५० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयांच्या २४ जागांना मान्यता देण्यात आली आहे़ त्यामुळे नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून अशाप्रकारच्या वाढीव जागा मिळविणारे राज्यातले हे दुसरे महाविद्यालय असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ़ चंद्रकांत मस्के यांनी दिली .
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कै़ डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत ५० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयांच्या २४ जागांना मान्यता देण्यात आली आहे़ त्यामुळे नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून अशाप्रकारच्या वाढीव जागा मिळविणारे राज्यातले हे दुसरे महाविद्यालय असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ़ चंद्रकांत मस्के यांनी दिली .
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहून अनेक राज्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांना प्रवेश क्षमतेत वाढीव जागा देण्यात आल्या होत्या़ जी महाविद्यालये नियम व अटीत बसतील अशा वैद्यकीय महाविद्यालयांना शासनस्तरावरुन मान्यता देण्यात आल्या आहे़
यात राज्यातल्या दोन महाविद्यालयातील एमबीबीएस प्रवेशक्षमतेत व पदव्युत्तरवाढीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली़ त्यात नांदेड जिल्ह्यातील कै़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे़ महाविद्यालयाच्या प्रवेशक्षमतेत ५० जागांची वाढ करुन त्यास २०१३ मध्ये तत्त्वता मान्यता देण्यात आली होती . संस्थेने गेल्या काही वर्षांत अनुभवी प्राध्यापक, भव्य इमारत, विविध सुविधा पूर्ण करुन एमसीआयच्या तपासणीत पात्र ठरल्यानंतर यावर्षी एमबीबीएसच्या प्रवेशक्षमतेला ५० जागांना शासनाने मान्यता दिली आहे़ तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेच्या २४ जागांनाही शासनाने मान्यता दिली आहे़
या वाढीव जागांमुळे नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पदवी शिक्षण घेण्यासाठी फायदा होणार असल्याचे मत अधिष्ठाता डॉ़चंद्रकांत मस्के यांनी व्यक्त केले़ तसेच भविष्यात ही प्रवेशक्षमता दीडशे जागापर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असून जागा वाढीत राज्यातले दुसरे महाविद्यालय असल्याचे ते म्हणाले़