जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत दारूच्या विक्रीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:18 AM2021-05-26T04:18:44+5:302021-05-26T04:18:44+5:30
बीअरची विक्री २१ टक्क्याने घटली, वाईनची मागणी ५७ टक्क्यांनी वाढली नांदेड- जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोना लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असताना गतवर्षीच्या ...
बीअरची विक्री २१ टक्क्याने घटली, वाईनची मागणी ५७ टक्क्यांनी वाढली
नांदेड- जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोना लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असताना गतवर्षीच्या तुलनेत दारू विक्री काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात देशी दारूच्या विक्रीत २ टक्के, विदेशी १.८५ तर वाइनच्या विक्रीत तब्बल ५७ टक्के वाढ झाली आहे. बिअरकडे मात्र लॉकडाऊनमध्ये ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना संकटात जिल्ह्यात दारूची दुकाने बंदच होती. काहीअंशी दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर दारूची मागणी काहीअंशी वाढली. गतवर्षी जिल्ह्यात देशी दारूची १ कोटी ४० लाख ६१ हजार १९९ लिटर विक्री झाली होती. यावर्षी १ कोटी ४२ लाख ७७ हजार ४३७ लिटर दारू विक्री झाली. कोरोनामध्ये दारू पिल्याने कोरोना होत नसल्याचा दावा अनेकांनी केला होता. त्यातूनही लॉकडाऊनमध्ये अनेकांनी दारू चोरट्या मार्गानेही विकत घेतली होती. दारू विक्रीत बिअरची विक्री मात्र कमी झाली. गतवर्षी ३२ लाख ४६ हजार ७०१ लिटर बिअर विक्री झाली होती. ती यंदा २५ लाख ६२ हजार ८०६ वर आली. तब्बल २१ टक्के घट बिअर विक्री झाली आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरुद्ध पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई केली. एप्रिल २०१९-२० मध्ये १३८१ गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर १ कोटी ४२ लाख ५७ हजार ७२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. २०२०-२१ मध्ये १८३३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, २ कोटी ८ लाख ७ हजार १०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चौकट---------------
जिल्ह्यात २०२०-२१या वर्षात ४८५ कोटींचे महसुली उद्दिष्ट राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले होते. या उद्दिष्टाची पूर्तता करण्यात विभागाला यश आले आहे. लॉकडाऊन कालावधीतही तब्बल ५१८ कोटी ६८ लाखांचा महसूल प्राप्त करण्यात आला आहे.
बिअरची विक्री घटली, वाइनची मागणी वाढली
जिल्ह्यात झालेल्या दारू विक्रीमध्ये बिअरची विक्री २१ टक्क्यांनी घटली आहे. ६ लाख ८३ हजार ८९५ लिटर विक्री गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली, तर त्याचवेळी वाइनच्या विक्रीत मात्र ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ५४ हजार ३४५ लिटर वाइन २०२०-२१या वर्षात विक्री झाली. गतवर्षी ३४ हजार ६०१ लिटर वाइनची विक्री झाली होती.
प्रतिक्रिया
मद्यविक्रीची दुकाने अंशता बंद असल्याने मद्यविक्रीत घट झाली आहे. महसुलावरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी अवैधरीत्या मद्य खरेदी करू नये. ज्यातून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यात कुठेही बनावट मद्य तयार होत असेल तर राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा संबंधित पोलीस ठाण्यास माहिती द्यावी.
- नीलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नांदेड.