७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:17+5:302021-06-21T04:14:17+5:30
भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोविडमुळे आई वडिलांचे, किंवा वडिलांचे किंवा आईचे छत्र हरपलेल्या इ. ५ वी ...
भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोविडमुळे आई वडिलांचे, किंवा वडिलांचे किंवा आईचे छत्र हरपलेल्या इ. ५ वी ते १२ वी पर्यंत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यम मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांची यादी घेतील. तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतील.
बीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शैक्षणिक संकुलातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इ ५ वी ते ११ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून त्याच संकुलात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नाश्ता, भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, दवाखाना, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध आहे.
हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, मोठी स्वप्ने दाखविणे व ते साकारण्यासाठी सक्षम करणे हे एक मोठे आव्हान आहे.
भारतीय जैन संघटनेने लातूर भूकंपातील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील १,१०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षात एकूण ३,००० विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे.
भारतीय जैन संघटना मागील ३० वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या क्षेत्रामध्ये अविरत कार्य करीत आहे.
जिल्ह्यात कोविडमुळे आई, वडिलांचे किंवा वडिलांचे किंवा आईचे छत्र हरपलेल्या इ. ५ वी ते ११ वी पर्यंत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांची यादी प्रशासनाकडून प्राप्त करून घेणार असून भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती मिळवतील व राज्य शासनाने शाळा व वसतिगृह सुरु केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पुढील शिक्षणासाठी त्यांना वाघोली पुणे येथे पाठविण्यात येईल अशी माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य हर्षद शहा व नांदेडचे प्रकल्प प्रमुख राजीव जैन यांनी दिली.