महागाईने घराचे बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:48+5:302021-07-04T04:13:48+5:30
कच्चा तेलाच्या किमती वाढल्या असल्याचे कारण देत शासनाकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दररोज वाढ केली जात आहे. आज पेट्रोल शंभरी पार ...
कच्चा तेलाच्या किमती वाढल्या असल्याचे कारण देत शासनाकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दररोज वाढ केली जात आहे. आज पेट्रोल शंभरी पार केले, तर डिझेलही शंभराच्या घरात आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वक्षेत्रावर बसत आहे. किराणा साहित्यासह भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनीही भाड्यांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे भाजीपाला, किराणा साहित्यात वाहनांची भाडेवाढही लावली जात आहे. दरम्यान, पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्याचा फटका चाकरमान्यांना अधिक बसत आहे. परंतु, भाजीपाल्याचे वाढीव दर हे शेतकऱ्यांच्या खिशात न जाता त्याचा अधिक फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. शहरातील सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यात गॅसच्या किमती वाढल्या असल्याने इतर खर्चावर नियंत्रण मिळविण्याच्यादृष्टीने गृहिणी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.
ट्रॅक्टरची आधुनिक शेतीही महागली...
मजुरापेक्षा आधुनिक आणि यांत्रिक शेती परवडली जात असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. परंतु, दिवसेंदिवस वाढणारे इंधनाचे दर आधुनिक शेतीचा स्पीडब्रेकर ठरत आहेत. त्यात बैलांची संख्या घटल्याने इच्छा नसूनही अनेकांना ट्रॅक्टरद्वारेच पेरणी करावी लागत आहे.
भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस वाढत असताना, गॅसच्या किमतीतही वाढ होत आहे. त्यात घरगुती गॅसवर मिळणारी सबसिडी कधीकधी मिळत नाही. त्यामुळे किचनचे ठरवून दिलेले बजेट वाढविण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांसाठी शासनाने महागाईवर नियंत्रण आणावे. - आशा कदम, गृहिणी
इंधर दरात झालेल्या भाववाढीचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. त्यात अनेकांकडून माल पार्सल केल्यानंतर आगाऊ भाड्याचे बोलले जाते. त्यामुळे अधिकचे दर कसे लावणार, असा प्रश्न पडतो. त्यामुळे वाहतूक भाडे अन् वाढीव किमतीचे गणित जुळविताना कसरत होते. - दीपक बागरेचा, व्यापारी