कुंडलवाडीत तीन शालेय विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:20 AM2018-11-01T00:20:51+5:302018-11-01T00:21:44+5:30
३० आॅक्टोबरच्या रात्री येथील इयत्ता १० वी व १२ वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दोन आरोपींनी बेदम मारले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवून बेड्या ठोकल्या़
कुंडलवाडी : ३० आॅक्टोबरच्या रात्री येथील इयत्ता १० वी व १२ वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दोन आरोपींनी बेदम मारले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवून बेड्या ठोकल्या़
कुंडलेश्वर मंदिर परिसरातील अजय पी़ इरन्ना उन्हाळे (वय १४), शुभम कोंडलिंग स्वामी, संतोष मोहन शिरामे (सर्व रा़ कुंडलवाडी) या शालेय विद्यार्थ्यांना ३० आॅक्टोबरच्या रात्री १० वाजता आरोपी सुनील शिवराम कोटलावार याने ‘तुम्ही तिघे अनिल इटलावार याच्यासोबत का फिरता’ असे विचारत येथील के़रामलू मंगल कार्यालयात जबरदस्तीने मोटारसायकलवर (क्ऱ एम़एच़२६-ए़वाय़९१०२) बसवून घेवून आला़ तेथे अगोदरच नागेश दिगांबर तडकासाट हा होता़
मंगल कार्यालयातील एका खोलीत बंद करून या तिन्ही विद्यार्थ्यांना चामडी पट्ट्याने मारहाण केली व नागेश तडकासाट याने बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले़ फिर्यादी अजय उन्हाळे, शुभम स्वामी व संतोष शिरामे यांच्या शरीराच्या संपूर्ण भागावर बांबू व चामडी पट्ट्याचे व्रण पाहून त्यांचे माता-पिता, नातेवाईक, शेजारी यांनी संताप व्यक्त केला़ आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने या मारहाणीत विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले़
सदर घटना डीवायएसपी नुरुल हसन यांना कळताच त्यांनी तत्काळ कुंडलवाडीस येऊन गंभीर मारहाणीने दुखापत झालेल्या तिन्ही शालेय विद्यार्थ्यांची झालेल्या प्रकाराबद्दल विचारपूस करून वैद्यकीय तपासणी अहवाल पाहता दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या़ उपविभागीय पोलीस अधिका-यांनी झालेल्या गंभीर प्रकाराची स्वत: दखल घेत तपास स्वत:कडे घेतल्याने स्थानिक पोलिसांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ के़रामलू मंगल कार्यालय नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिले असून त्याची रात्रीच्या वेळी चावी आरोपीकडे कशी काय देण्यात आली? अनिल इटलावार याचा या घटनेशी काय संबंध ? घटनेपूर्वी आरोपी स्थानिक एकाच्या घरात दोनदा नेमके कशासाठी गेले? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे़
प्रकरणात काही अनुत्तरीत प्रश्न
- के़रामलू मंगल कार्यालय नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिले असून त्याची रात्रीच्या वेळी चावी आरोपीकडे कशी काय देण्यात आली ?
- अनिल इटलावार याचा या घटनेशी काय संबंध ?
- घटनेपूर्वी आरोपी स्थानिक एकाच्या घरात दोनवेळा नेमके कशासाठी गेले हे प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत़