नांदेडच्या कुलगुरूंचा पुढाकार ठरला दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:12+5:302021-06-19T04:13:12+5:30
नांदेड : काेराेनाच्या महामारीत संशयितांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी आणि त्यांचे अहवाल तातडीने देण्याचे आव्हान राज्यात निर्माण झाले असताना नांदेड ...
नांदेड : काेराेनाच्या महामारीत संशयितांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी आणि त्यांचे अहवाल तातडीने देण्याचे आव्हान राज्यात निर्माण झाले असताना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. उद्धव भाेसले यांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार राज्यात दिशादर्शक ठरला. विद्यापीठाने आपल्या उपलब्ध यंत्रणेच्या मदतीने नमुने तपासणी करून तातडीने अहवाल आराेग्य िुविभागाला उपलब्ध करून देण्याचा हा नांदेड पॅटर्न पुढे औरंगाबाद व अमरावती विद्यापीठानेही स्वीकारला. मार्च २०२० पासून काेराेनाचे संकट निर्माण झाले. पुढे अनेक जिल्ह्यांत काेराेनाचा उद्रेक वाढला. नांदेड शहर व जिल्हा त्यात अधिक आघाडीवर हाेता. दरदिवशी माेठ्या संख्येने काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची भर पडत हाेती. सुरुवातीला संशयिताच्या लाळेचे (स्वॅब) नमुने तपासणीसाठी औरंगाबाद, पुणे, हैदराबाद येथे जात हाेते. तेथून अहवाल येण्यास किमान पाच दिवस प्रतीक्षा करावी लागत हाेती. ताेपर्यंत संशयित समाजात विविध ठिकाणी वावरून अप्रत्यक्षरीत्या काेराेनाचा फैलाव करण्यास हातभार लावत हाेता. हा धाेका ओळखून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू डाॅ. उद्धव भाेसले यांनी पुढाकार घेतला. आपल्या विद्यापीठाच्या प्रयाेगशाळेतील उपलब्ध यंत्रसामुग्री व मनुष्यबळाच्या जाेरावर येथेच काेराेना संशयितांचे नमुने तपासणीची कल्पना जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्यापुढे मांडली. ही कल्पना ना. चव्हाण यांनी लगेच उचलून धरली. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह काेश्यारी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर आणि जिल्ह्यातील खासदार- आमदारांनीही या कल्पनेला ग्रीन सिग्नल दिला. राष्ट्रीय वैद्यकीय संशाेधन परिषद आणि राष्ट्रीय टेस्टिंग लॅबचीही मंजुरी मिळाल्यानंतर विद्यापीठात प्रत्यक्ष नमुने तपासणीचे काम सुरू झाले.
दरदिवशी दीड हजार नमुन्यांची तपासणी
विद्यापीठाच्या प्रयाेगशाळेची दरदिवशी नमुने तपासणीची क्षमता ५०० ची हाेती. मात्र, समाजातील काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कुलगुरू डाॅ. भाेसले यांनी ही क्षमता तिपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रयाेगशाळेचे प्रमुख डाॅ. जी.बी. झाेरे यांच्या नेतृत्वातील यंत्रणेचे परिश्रम महतत्त्वपूर्ण ठरले. प्रयाेगशाळेतील काम तीन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) सुरू झाले. ५०० ऐवजी दरदिवशी १,५०० नमुन्यांची तपासणी केली जाऊ लागली. एवढेच नव्हे, तर २४ तासांत त्याचा अचूक अहवालही दिला जाऊ लागला. प्रयाेगशाळेवरील कामाचा वाढलेला ताण पाहून जिल्हा शल्यचिकित्सकांनी आपल्या स्तरावर काही मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. विद्यापीठाने आतापर्यंत १ लाख ५३ हजार ४२६ काेराेना स्वॅबची तपासणी केली आहे. विशेष असे, या तपासणीमध्ये काेठेच किंचितही चूक झाली नाही. हे प्रयाेगशाळेतील यंत्रणेच्या सूक्ष्म व काटेकाेर कामकाजाचे फलित मानले जात आहे.
चाैकट ..................
औरंगाबाद, अमरावतीने पॅटर्न स्वीकारला
विद्यापीठात काेराेनाच्या संशयित नमुन्यांची तपासणी करणारा हा नांदेड पॅटर्न संपूर्ण राज्यासाठीच दिशादर्शक ठरला. या पॅटर्नची नांदेडपाठाेपाठ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद व संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांनी लगेच अंमलबजावणी केली. विद्यापीठांमधील प्रयाेगशाळेतून हाेणाऱ्या या स्वॅब तपासणीला आराेग्य यंत्रणेला कमालीचा फायदा झाला. शिवाय अहवालाच्या प्रतीक्षेत संशयित रुग्णाची भटकंती व त्यातून हाेणाऱ्या काेराेनाच्या प्रसारालाही माेठा ब्रेक लागला.
चाैकट......
कुलपती, मंत्र्यांकडून काैतुकाची थाप
नांदेडच्या विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. उद्धव भाेसले यांच्या या स्वत:हून पुढाकार घेऊन स्वॅब तपासणी व अचूक अहवाल देण्याच्या पॅटर्नचे कुलपती, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व इतरही लाेकप्रतिनिधींनी ताेंडभरून काैतुक केले. कुलगुरू डाॅ. भाेसले यांची सकारात्मक विचारसरणी व स्वत:हून काहीतरी चांगले करण्याच्या या प्रयत्नामुळे विद्यापीठाच्या वैभवात आणखी भर पडली आहे. नमुने तपासणीचे काम सध्याही अविरत सुरू आहे.
काेट ........
‘विद्यापीठाच्या प्रयाेगशाळेत आतापर्यंत दीड लाखावर नमुन्यांची तपासणी करून अचूक अहवाल देण्यात आला आहे. हे प्रयाेगशाळेच्या यंत्रणेचे यश आहे. विद्यापीठाचा अन्यही सामाजिक उपक्रमांत या पुढेसुद्धा सुमाेटाे पुढाकार कायम असेल.’
-डाॅ. उद्धव भाेसले, कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड