न्यायदानासोबत आरोग्य सेवेसाठीही घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:47 AM2019-04-21T00:47:53+5:302019-04-21T00:50:12+5:30

येथील न्यायालयाच्या विधि सेवा समिती व अभियोक्ता संघाने न्यायदानाच्या पवित्र कार्याला सामाजिक कार्याची जोड देत उपेक्षित कुटुंबातील ३७ रुग्णांना नवीन जीवन देण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे.

Initiatives for health service with justice | न्यायदानासोबत आरोग्य सेवेसाठीही घेतला पुढाकार

न्यायदानासोबत आरोग्य सेवेसाठीही घेतला पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देभोकर येथील विधिसेवा समितीचा उपक्रम३७ रुग्णांना दिले जीवनदान

राजेश वाघमारे।
भोकर : येथील न्यायालयाच्या विधि सेवा समिती व अभियोक्ता संघाने न्यायदानाच्या पवित्र कार्याला सामाजिक कार्याची जोड देत उपेक्षित कुटुंबातील ३७ रुग्णांना नवीन जीवन देण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. या कार्यामुळे न्यायालयीन क्षेत्रात न्या. एम. एस. शेख यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
न्यायालय हे मंदिर अशी लोकमान्यता लाभलेल्या न्यायालयाने न्यायदानासोबत सामाजिक कार्याचा वसा घेवून मानवसेवा करीत असल्याचे उदाहरण अन्यत्र कुठेही सापडणार नाही. तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोकर शहरात १९६२ मध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालयाची स्थापना झाली. यातच २०१० मध्ये जिल्हा व सत्र न्यायालय, वरिष्ठ दिवाणी न्यायालय झाले. सात्यत्याने ५६ वर्षे न्यायदानाची सेवा करीत सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या न्यायालयातील अभियोक्ता संघाने व विधि सेवा समितीने न्यायदानासोबत समाजसेवा हे उद्दिष्ट ठेवून सामाजिक कार्य हाती घेतले. यास खºया अर्थाने २०१७ मध्ये चालना मिळाली, ती न्या. एम. एस. शेख यांची जिल्हा न्यायाधीश -१ म्हणून येथे नेमणूक झाली तेव्हा. त्यांच्यातील समाजसेवा भाव, न्यायप्रियता, सहज सामान्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणारा स्वभाव यामुळे अल्पावधीतच येथील विधितज्ज्ञ आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची मने जिंकली. विधि सेवा समितीचे अध्यक्ष न्या. शेख यांनी अभियोक्ता संघाच्या वतीने सर्वप्रथम मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर २०१७ रोजी तालुक्यातील सर्व शासकीय विभागांना विश्वासात घेवून तालुक्यातील ऐतिहासिक गणेश मंदिर येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ‘ शासकीय योजनांची जनजागृती ’ हा कार्यक्रम घेतला. यात उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक, संबंधित विभागाच्या कर्मचाºयांना सहभागी करुन घेतले. याच ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील रुग्णांना धर्मादाय आयुक्त यांच्यामार्फत मोफत आरोग्य उपचार उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला. त्यानंतर शहरात भव्य जनजागरण रॅली काढण्यात आली.
सरकारच्या लोकअदालतीच्या महत्त्वाकांक्षी योजनेत येथील न्यायालयात प्रलंबित अनेक प्रकरणांत तडजोड करुन जिल्ह्यात आघाडी घेवून प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. त्यातून प्रकरणे निकाली तर निघालीच तसेच शासनाला कोट्यवधींचा महसूल प्राप्त झाला. याच माध्यमातून अनेक वर्षांपासून दांपत्यवादाच्या प्रकरणात तडजोड करुन विभक्त संसार जोडून घटस्फोटापासून परावृत्त करुन त्यांची न्यायालयातूनच माहेराप्रमाणे साडीचोळी देवून पाठवणी केली. तालुक्यातील पिंपळढव येथील रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. त्यात तडजोडीने मार्ग काढून निकाली काढले. पोलीस ठाणे, पंचायत समिती, न्यायालय व किनी येथे विधि चिकित्सालय काढून नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र तयार केले. शहरातील डॉक्टर्स व मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर घेवून ६५० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
३७ रुग्णांवर यशस्वी उपचार
न्यायदानासोबतच आरोग्यसेवेचा वसा घेतलेल्या विधि सेवा समिती व अभियोक्ता संघाने आतापर्यंत तालुक्यातीलच नव्हे, तर मराठवाड्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गंभीर आजाराने ग्रस्त ३७ रुग्णांना धर्मादाय आयुक्त व सहाय्यक धर्मादाय आयुक्त आणि आरोग्य विभाग यांच्यामार्फत वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन दिले. यात १ एड्सग्रस्त, १९ कॅन्सर पीडित रुग्ण व इतर गंभीर आजारांच्या रुग्णांवर मुंबई, पुणे, नांदेड आदी ठिकाणच्या मोठ्या रुग्णालयांत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येवून जीवनदान देण्याचे कार्य निरंतर सुरुच आहे. येथून पाठविलेल्या काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया २० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या होत्या. ज्या दुर्बल घटकातील कुटुंबाला न परवडणाºया आहेत. विजयकुमार तेलंगे या दीड महिन्यांच्या कॅन्सरग्रस्त बालकावर मुंबई येथे ६ महिने रुग्णालयात उपचार करण्यात आले.

  • शेतकरी जगाचा पोशिंदा असून सततची नापिकी व आर्थिक अडचणीतून आत्महत्येसारखा विचार करीत आहे. त्यास आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने तालुका विधिसेवा समिती कशाप्रकारे मदत करु शकते. सावकारी कजार्तून मुक्ती मिळविण्याकरिता न्यायालयाची मध्यस्थी केंद्र कसे चालते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘आत्महत्या करु नका धनी ’ या लघु चित्रपटाची निर्मिती न्यायालयीन वकील, विधिसेवा समितीचे सदस्यांनी भूमिका साकार करुन तयार केली आहे. या लघुपटाचा लोकार्पण सोहळा २१ एप्रिल रोजी एका सोहळ्यात करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील अकिल युसूफ मुजादार यांनी याचा लाभ घेवून पत्र लिहिले की, माझी आई बानुबी मुजावर हिस पोटातील गाठीचा कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर कोकीलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने आईस नवीन जीवनदान मिळाल्याने विधिसेवा समितीचे आभार व्यक्त केले. विधि सेवा समितीच्या न्यायदानाबरोबरच आरोग्य सेवेचा वसा रुग्णांसाठी जीवनदायी आहेच. त्याचा लाभ समाजाला होत आहे.
- अकिल मुजादार, रुग्णाचा मुलगा

 

Web Title: Initiatives for health service with justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.