तलाठ्यांची बेपर्वा वृत्ती शेतकऱ्यांना भोवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:40 AM2019-03-01T00:40:52+5:302019-03-01T00:41:15+5:30
शेतक-यांचे पंधरा आकडी खाते क्रमांक टाकून असे स्पष्ट करून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या देगलूर शाखेने तहसीलदारांना याद्या परत पाठविल्या. परंतु आठ दिवसानंतर देखील कोणताही बदल न करताच याद्या बँकेला परत पाठविण्यात आल्याने सगळा घोळ झाला आहे.
श्रीकांत कुलकर्णी।
देगलूर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी शासनाने देगलूर तालुक्यासाठी ३० कोटी रुपये तात्काळ दिले. मात्र बहुतांश तलाठ्यांनी शेतक-यांचे खाते क्रमांक अर्धवट टाकून बँकेला याद्या दिल्यामुळे सगळा घोळ झाला आहे.
शेतक-यांचे पंधरा आकडी खाते क्रमांक टाकून असे स्पष्ट करून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या देगलूर शाखेने तहसीलदारांना याद्या परत पाठविल्या. परंतु आठ दिवसानंतर देखील कोणताही बदल न करताच याद्या बँकेला परत पाठविण्यात आल्याने सगळा घोळ झाला आहे.
देगलूर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर झाला असून दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतक-यांना प्रति हेक्टरी ६८०० रुपये दोन हेक्टरपर्यंत दोन टप्प्यात शेतक-यांना देण्यात येणार आहे. शेतक-यांना अनुदान देण्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात ८ कोटी ७१ लाख ६० हजार रुपये, दुस-या टप्प्यात ९ कोटी ९ लाख १ हजार रुपये तर तिस-या टप्प्यात १२ कोटी २३ लाख ८९ हजार रुपये असे एकूण ३० कोटी ४ लाख ५१ हजार रुपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. मध्यवर्ती बँकेच्या देगलूर शाखेत ४० गावातील शेतकºयांचे खाते असून या बँकेमार्फत २९ हजार ६५५ शेतक-यांना दुष्काळाचे अनुदान वाटप केले जाणार आहे. पहिल्या हप्त्यापोटी या बँकेला १० कोटी ८३ लाख ४९ हजार रुपये प्राप्त झाले आहेत.
२०१६ चे विमा वाटप रखडले
ज्या शेतक-यांनी २०१६ मध्ये आपल्या पीक विमा काढला नव्हता अशा शेतक-यांना पन्नास टक्के पीक विमा देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याचे पैसे ही येवून तीन महिण्याचा कालावधी लोटला. केवळ शेतक-यांच्या याद्यात वारंवार घोळ झाल्यामुळे हा पैसा सुद्धा काही गावातील शेतक-यांच्या हाती पडू शकला नाही. देगलूर शाखेत आणखी आठ कोटी रुपये वाटपाचे काम बाकी आहे. हाळी, माळेगाव, बेम्बरा, मानूर, गोगला गोविंद तांडा आदी गावातील शेतकरी या पैशासाठी बँकेत व तलाठ्याकडे खेटे घालत आहेत. बँकेला याद्या दिल्याचे तलाठी सांगतात तर बँकेचे अधिकारी अद्याप याद्याच आल्या नसल्याचे सांगतात. त्यामुळे या गावातील शेतक-यांना २०१६ ची पीक विमा रक्कम मिळेल की नाही याची साशंकता निर्माण झाली आहे.
खाते क्रमांकाचा घोळ
दुष्काळग्रस्त शेतक-यांना अनुदान देण्यासाठी ज्या याद्या तलाठ्यांनी दिल्या़ त्यातच सगळा घोळ झाला आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते क्रमांक पंधरा अंकाचे आहे. काही तलाठ्यांनी लाभार्थी शेतक-यांच्या तयार केलेल्या यादीमध्ये खाते क्रमांकाचे शेवटचे केवळ चार अंक तर काही तलाठ्यांनी अखेरचे चार अंक सोडून उर्वरित अकरा अंकाचे खाते क्रमांक दिले. कामचुकार वृत्तीच्या काही तलाठ्यांनी खाते क्रमांकाचा रकानाच मोकळा सोडून दिला.
तहसीलने जशीच्या तशी यादी पाठविली
तहसील कार्यालयामार्फत आलेल्या यादीमध्ये लाभार्थ्यांचे खाते क्रमांक अर्धवट असल्याने ती परत पाठविल्यानंतर तहसील कार्यालयाने कोणतीही दुरुस्ती न करता जशास तशी यादी परत पाठविली आहे. त्यामुळे नाव आणि खाते क्रमांक पाहून अनुदान रक्कम जमा करण्यास किती वेळ लागेल हे आपण सांगू शकत नाही असे येथील शाखेचे शाखाधिकारी सुभाष कºहाडे यांनी सांगितले. कावळगड्डा येथील तलाठ्याने ९० टक्के शेतक-यांच्या खाते क्रमांकासमोर अखेरचे चार अंक टाकून यादी सादर केल्याचे दिसून आले.
४० गावांतील ४१ हजार शेतक-यांचे खाते
ज्या अर्थी पीक विमा उतरविला आहे़ त्याअर्थी त्या शेतक-यांकडे बँकेचे खाते उपलब्ध आहे असा होतो. प्रत्येक तलाठ्याने आपल्या सज्जतील गावामध्ये जाऊन खाते क्रमांक घेण्याची तसदी घेतली असती तर अनुदान रक्कम मिळण्यास विलंब झाला नसता. मध्यवर्ती बँकेच्या देगलूर शाखेत तालुक्याच्या चाळीस गावातील जवळपास ४१ हजार शेतक-यांचे खाते आहे. महसूल प्रशासनाने लाभार्थी शेतक-यांच्या याद्या अपु-या माहितीसह देऊन सोपस्कार पूर्ण केले. शाखेत अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शेतक-यांना अनुदानासाठी तात्काळ पैसा दिला पण तलाठ्यानी त्यांचे काम मनावर घेवून न केल्यामुळे शेतक-यांना अनुदानाचा पैसा त्यांच्या हातात दोन महिन्यानी पडेल की त्यास आणखी कालावधी लागू शकतो याबाबत अनिश्चितता कायम आहे.