मनपाकडून दुकानांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:50 AM2019-04-29T00:50:07+5:302019-04-29T00:50:34+5:30
कॅरिबॅग बंदीचा कायदा लागू झाल्यापासून नांदेड शहरात मनपाच्या पथकांनी मोठ्या प्रमाणात कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त केले आहे़ रविवारी सिडको आणि अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकांनी वॉटर प्लान्ट, पाणी पाऊ च विक्रेते यांची तपासणी करुन १७ पोती कॅरिबॅग जप्त केल्या आहेत़
नांदेड : कॅरिबॅग बंदीचा कायदा लागू झाल्यापासून नांदेड शहरात मनपाच्या पथकांनी मोठ्या प्रमाणात कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त केले आहे़ रविवारी सिडको आणि अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकांनी वॉटर प्लान्ट, पाणी पाऊ च विक्रेते यांची तपासणी करुन १७ पोती कॅरिबॅग जप्त केल्या आहेत़ यावेळी विक्रेत्यांना १५ हजार रुपयांचा दंड फाडण्यात आला आहे़
कॅरिबॅग बंदी लागू झाल्यापासून शहरातील एकट्या जुना मोंढा परिसरातून मनपाच्या पथकांनी लाखो रुपयांच्या कॅरिबॅग जप्त केल्या आहेत़ काही व्यापाऱ्यांवर तर तीन-तीन वेळेस धाड मारण्यात आली़ त्याचबरोबर या व्यापाऱ्यांना माल पुरवठा करणाºयालाही दंड ठोठावण्यात आला आहे़ तरीही नांदेडात छुप्या मार्गाने कॅरिबॅग वापरण्यात येत असल्याचे आढळून येत आहे़ त्यामुळे महापालिकेने पुन्हा मोहीम सुरु केली आहे़ शनिवारी या भागातील अनेक व्यापाºयांवर कारवाई करण्यात आली होती़ रविवारी सिडको भागात वॉटर प्लान्टची तपासणी करण्यात आली़ तसेच पाण्याच्या बाटल्या घेवून जाणाºया वाहनांमध्ये पाणी पाऊच आहेत काय? याचीही चौकशी केली़ एम़जी़ रोड भागात अवेश कलेक्शनला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला़ या भागातील अनेक किराणा दुकानांची यावेळी तपासणी करण्यात आली़
तर अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत दोन ठिकाणांहून कॅरिबॅग जप्त करुन दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़ प्रभारी आयुक्त काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विलास भोसीकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली़
दरम्यान, शहरातील अनेक वॉटर प्लान्टवर आजही पाणी पाऊच तयार करण्यात येत आहेत़ पानटपरीपासून ते किराणा दुकानात अगदी सहजपणे हे पाणी पाऊच मिळत आहेत़