निरीक्षकास मारहाण प्रकरण थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:38 AM2019-03-20T00:38:29+5:302019-03-20T00:38:50+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड आगारातील वाहतूक निरीक्षक सुमेध निकाळजे यांना सोमवारी काही वाहकांनी संगनमत करून मारहाण केली़
नांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड आगारातील वाहतूक निरीक्षक सुमेध निकाळजे यांना सोमवारी काही वाहकांनी संगनमत करून मारहाण केली़ या घटनेला चोवीस तास उलटूनही कोणावरही कारवाई करण्यात आली नाही़ त्यामुळे सदर प्रकरण दडपले की काय? अशी चर्चा नांदेड आगारात मंगळवारी ऐकायला मिळाली़
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार म्हणून नांदेड आगाराची ओळख आहे़ परंतु, मध्यवर्ती बसस्थानक आणि आगारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक राहिला नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ सोमवारी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक निरीक्षक सुमेश निकाळजे यांना कर्तव्यावर नसलेल्या पाच वाहकांनी संगनमत करून मारहाण केल्याची तक्रार आहे़ या घटनेसंदर्भात मारहाण झालेल्या वाहतूक निरीक्षक सुमेध निकाळजे यांनी पाच वाहकांविरोधात वजिराबाद ठाण्यात मारहाण आणि शिवीगाळप्रकरणी तक्रार दिली आहे़ परंतु, तक्रारीच्या चोवीस तासानंतरही कोणावरही गुन्हा नोंदविण्यात आला नाही़ तर स्थानिक एसटी प्रशासनाने मंगळवारी सायंकाळपर्यंत कुठलीही कार्यवाही केली नसल्याची बाब पुढे आली आहे़
या प्रकरणात महामंडळात कार्यरत असलेल्या एसटी कामगार संघटना आणि एसटी कामगार सेनेने प्रतिष्ठेचा विषय बनविल्याची चर्चादेखील आगारात ऐकायला मिळत आहे़ परंतु, कर्तव्यावर असताना एखाद्या अधिकाऱ्यास मारहाण झाल्यानंतर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसेल तर अशा घटना वारंवार घडतील, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़
दरम्यान, याप्रकरणी नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात आगारप्रमुख आणि सुरक्षा अधिकारी हे संबंधित कर्मचा-यांचे जबाब घेत आहेत़ मारहाण प्रकरणाची सत्यता पडताळून दोषींवर निश्चिपणे कारवाई होईल़ आगारप्रमुख आणि सुरक्षा अधिकारी यांच्या पातळीवर कारवाई होईल, असे विभाग नियंत्रक अविनाश कचरे यांनी सांगितले़
- कर्तव्यावर असताना मारहाण होवूनदेखील प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही़ तर तक्रार करूनही ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत नाही, ही बाब गंभीर असून प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव एम़ बी़ बोर्डे यांनी केला आहे़