दहशतवादी रिंदाविराेधात इंटरपाेलची ‘रेड काॅर्नर’ नाेटीस; देशभरात पाठवल्या स्फोटकांच्या ३५ खेपा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 02:15 PM2022-06-13T14:15:35+5:302022-06-13T14:20:01+5:30
‘इंटरपाेल’ची कारवाई : महाराष्ट्रात १६, तर पंजाबात २५ गुन्हे दाखल
- राजेश निस्ताने
नांदेड : गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराज्यीय पाेलिसांना वाॅन्टेड असलेला व सध्या पाकिस्तानात दडून असल्याचा संशय असलेल्या कुख्यात दहशतवादी हरविंदर संधु ऊर्फ रिंदा याच्याविराेधात अखेर शुक्रवारी १० जूनराेजी इंटरपाेलने रेड काॅर्नर नाेटीस जारी केली आहे. त्यामुळे रिंदा आता पकडला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल राेजी त्यांच्या येथील राहत्या घरासमाेर भरदिवसा अज्ञात दाेन मारेकऱ्यांनी गाेळ्या झाडून हत्या केली हाेती. स्थानिक विमानतळ पाेलीस ठाण्यात विविध कलमांन्वये दाखल गुन्ह्यात रिंदा मुख्य आराेपी असून, त्यानेच कट रचल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. रिंदाचे कटात सहभागी ११ साथीदार पाेलिसांनी पकडले असून, प्रत्यक्ष गाेळ्या झाडणाऱ्या दाेन शार्पशूटरसह आणखी काही आराेपींचा शाेध घेतला जात आहे. याचदरम्यान, नांदेडकडे येणारी स्फाेटके व शस्त्रसाठा हरियाणातील करनाल येथे माेठ्या संख्येने पकडला गेला. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा संस्थांनी नांदेडवर लक्ष केंद्रित केले. हा शस्त्रसाठा रिंदानेच पाकिस्तानातून पाठविल्याचा संशय आहे.
रिंदावर खून, खंडणी, अपहरण, स्फाेटके-शस्त्र तस्करी, गाेळीबार यासारखे महाराष्ट्रात १६, तर पंजाबमध्ये २५ गुन्हे दाखल आहेत. हरियाणा, दिल्ली व इतर राज्यांतही असेच काही गुन्हे असण्याची शक्यता आहे. एकट्या नांदेडमध्ये रिंदाविराेधात खुनाचे तीन व फायरिंगचे पाच गुन्हे नाेंद आहेत. पाकिस्तानात राहून ताे साथीदारांमार्फत नांदेडमध्येही धमक्या, खंडणी यासारख्या कारवाया करीत असल्याचे बियाणी प्रकरणावरून निष्पन्न झाले.
बियाणी यांच्याकडेही रिंदाने ५ काेटी रुपयांची खंडणी मागितली हाेती. रिंदा हा महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, दिल्लीसह इतर राज्यांना वाॅन्टेड आहे. पंजाब पाेलिसांच्या दप्तरी त्याची माेस्ट वाॅन्टेड म्हणून नाेंद आहे. त्याच्या देशविघातक हालचाली लक्षात घेऊन संबंधित सर्वच राज्यांच्या मागणीवरून अखेर त्याच्याविराेधात इंटरपाेलने रेड काॅर्नर नाेटीस १० जूनराेजी जारी केली. रिंदा पाकिस्तान किंवा कॅनडात असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या नाेटीसमुळे ताे ज्या देशात असेल तेथे त्याला पकडून भारताच्या स्वाधीन करावे लागणार आहे.
स्फाेटके, शस्त्रांच्या ३५ खेपा ?
रिंदाने पाकिस्तानातून पाठविलेली स्फाेटके व शस्त्रांची एक खेप चार दहशतवाद्यांसह हरियाणा पाेलिसांनी पकडली. ती नांदेडमार्गे तेलंगणाकडे जाणार हाेती, असे सांगितले जाते. रिंदाने अशाच पद्धतीने देशभरात स्फाेटके व शस्त्रांच्या ३५ खेपा (कन्साइनमेंट) पाठविल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडून या खेपा नेमक्या काेणकाेणत्या राज्यात पाठविल्या गेल्या, याचा शाेध घेतला जात आहे. ही स्फाेटके महाराष्ट्रातही आली का, याची तपासणी सुरक्षा व गुप्तचर संस्थांकडून केली जात आहे.