भाजपचा विद्यमान आमदार असताना मुखेडमध्ये आठ जणांनी दिल्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:31 PM2019-09-06T18:31:02+5:302019-09-06T18:37:36+5:30
लोह्यातही रस्सीखेच
नांदेड : मुखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांची विद्यमान कारभाराबाबतची नाराजी पुन्हा पुढे आली. येथे आ. डॉ. तुषार राठोड यांच्यासह ९ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. विशेष म्हणजे यात त्र्यंबक सोनटक्के, व्यंकटराव गोजेगावकर या भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
रामदास पाटील यांनी मुखेडमधून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे दावेदारी केली आहे. दुसरीकडे सोनटक्के यांच्यासह गोजेगावकर यांच्यासह इतर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीही तुषार राठोड यांच्यासोबत राहण्याऐवजी रणजित पाटील यांच्याकडे मुलाखत देवून उमेदवारीची मागणी केली. लोहा विधानसभा मतदारसंघातही तब्बल ९ जणांनी मुलाखत दिली. प्रवीण पाटील चिखलीकर यांचे नाव या मतदारसंघातून पुढे असले तरी माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनीही भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी मोठी ताकद लावली आहे. गुरुवारी शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी आशा शिंदे आणि विक्रांत श्यामसुंदर शिंदे यांनीही मुलाखत दिली.
भाजपा पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यातील सर्व ९ मतदारसंघातील इच्छुकांच्या गुरुवारी मुलाखती घेतल्या. हा एकप्रकारे शिवसेनेलाही इशारा असल्याचे मानले जात आहे. सोबत आलात तर युती अन्यथा भाजपाची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचेच पक्षाने या मुलाखतींच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा हक्क असलेल्या तसेच विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातही विधानसभेसाठी भाजपाकडून अनेक जण रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले.