‘अल्झायमर’ आजारावर ‘इंट्रानेसल स्प्रे’चा उपचार ! नांदेडच्या शिवराजला ‘गांधीयन यंग इनोव्हेशन’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 04:33 PM2020-08-11T16:33:15+5:302020-08-11T16:36:56+5:30

स्मृतिदोष अर्थात ‘अल्झायमर’ या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत़ त्यावर उपचार पद्धती शोधण्याचे कार्य शिवराज करीत आहे़.

Intranasal spray treatment for Alzheimer's disease! 'Gandhian Young Innovation' Award to Shivraj Naik of Nanded | ‘अल्झायमर’ आजारावर ‘इंट्रानेसल स्प्रे’चा उपचार ! नांदेडच्या शिवराजला ‘गांधीयन यंग इनोव्हेशन’ पुरस्कार

‘अल्झायमर’ आजारावर ‘इंट्रानेसल स्प्रे’चा उपचार ! नांदेडच्या शिवराजला ‘गांधीयन यंग इनोव्हेशन’ पुरस्कार

Next
ठळक मुद्देराष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव १९१० साली ‘अल्झायमर’ आजाराचा शोध लागला आहे़यावर ठोस उपचार पद्धती उपलब्ध झालेली नाही़

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कल्हाळी येथील शिवराज नाईक या युवा संशोधकाने प्रशंसनीय कामगिरी करताना  मेंदूशी निगडीत अल्झायमर या आजारावर प्रभावी उपचार करण्यासाठी ‘नॅनो टेक्नॉलॉजी’वर आधारीत ‘इंट्रानेसल स्प्रे’ची निर्मिती करीत प्रशंसनीय कामगिरी केली.

या स्पृहणीय कार्याबद्दल शिवराज नाईक या युवा संशोधकाची यावर्षीच्या ‘गांधीयन यंग इनोव्हेशन’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे़ शिवराजचा १५ लाख रुपये, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. विशेष म्हणजे देशातील १५ विद्यार्थ्यांना यंदा राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे़ त्यात शिवराज हा महाराष्ट्रातून एकमेव संशोधक आहे़ नांदेड शहरातील बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कुलचा माजी विद्यार्थी असलेला शिवराज नाईक सध्या भारतीय रसायन तंत्रज्ञान (आयसीटी) संस्था माटूंगा मुंबई येथे रिसर्च स्कॉलर म्हणून कार्यरत आहे़  तो कंधार तालुक्यातील कल्हाळी या गावचा रहिवाशी आहे. तो कल्हाळी येथील ३५ हुतात्म्यांच्या हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या हुतात्मा अप्पासाहेब नाईक यांच्या परिवारातील आहे. मुंबईतील आयसीटी संस्थेत रिसर्च स्कॉलर म्हणून तो काम करीत आहे़

उंदीर, सशावर स्प्रेचा प्रयोग
एखादे औषध तयार केल्यानंतर त्यास विविध पायऱ्यावर सिद्ध करावे लागते़ यामध्ये ‘क्लिनीकल’ आणि ‘प्रि क्लिनीकल’ चाचण्यांना सामोरे जावे लागते़ या स्प्रेचे उंदीर तसेच सश्यावर प्रयोग करीत ‘प्रि क्लिनीकल’ टेस्ट पूर्ण करण्यात आली असून, ‘क्लिनीकल टेस्ट’साठी प्रयत्न सुरु आहेत़  ‘क्लिनीकल टेस्ट’मध्येही विविध प्रकारच्या चार पायऱ्या आहेत़ मात्र, यासाठी मोठ्या मनुष्यबळासह निधीचीही गरज असते़ त्यामुळे शासन तसेच मल्टीनॅशनल कंपन्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून प्रयत्न सुुरु असल्याचे शिवराजयांनी सांगितले़

भारतात अल्झायमर रोगाचे रुग्ण जास्त
स्मृतिदोष अर्थात ‘अल्झायमर’ या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत़ त्यावर उपचार पद्धती शोधण्याचे कार्य शिवराज करीत आहे़ १९१० साली ‘अल्झायमर’ आजाराचा शोध लागला आहे़ मात्र, अद्यापही यावर ठोस उपचार पद्धती उपलब्ध झालेली नाही़ या आजारामध्ये मेंदूमधील ‘न्यूरॉन’ हळूहळू नष्ट होऊ लागतात़ परिणामी व्यक्तीच्या दैनंदिन कामावर परिणाम होतो़ तसेच मेंदूचे कार्य थांबत जाऊन शेवटी मृत्यूही ओढावतो़ अशा आजारी रुग्णांसाठी बाहेर देशात ‘केअर टेकर’ ठेवले जातात़ मात्र आपल्याकडे ते परवडणारे नाही़ च्सध्या स्मृतिदोषावर तोंडावाटे घेण्याची चार औषधी उपलब्ध आहेत; परंतु मेंदू आणि तोंडाच्या मध्ये ‘ब्लड ब्रेन बॅरीअर’ हा पडदा असतो़ हा पडदा तोंडावाटे घेतलेले औषध मेंदूपर्यंत पोहोचू देत नाही़ त्यामुळे सध्यातरी वरील चारही औषधांची उपयुक्ताताही १ टक्क्यापेक्षा कमी आहे़ त्यामुळेच मेंदूपर्यंत औषध पोहोचविण्यासाठी शिवराज नाईक याने या ‘इंट्रानल’ स्प्रेची निर्मिती केली़

तंत्रज्ञान प्रत्यक्ष उपयोगासाठी प्रयत्न
देशातील १५ विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे़ पुरस्कार निवड समितीने घेतलेल्या तीनही चाचण्यांमध्ये हा स्पे्र अव्वल ठरला आहे़ त्यामुळे  ‘गांधीयन यंग इनोव्हेशन अवॉर्ड’साठी माझी निवड झाल्याचा आनंद आहे़ प्रयोगशाळेतील हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष लोकांच्या उपयोगासाठी यावे़ यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत़ या संशोधनासाठी माटुंग्यातील आयसीटी संस्थेच्या प्राध्यापक वंदना पत्रावळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले़   
- शिवराज नाईक, रिसर्च स्कॉलर

Web Title: Intranasal spray treatment for Alzheimer's disease! 'Gandhian Young Innovation' Award to Shivraj Naik of Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.