धान्य घोटाळ्याचा तपास थंड बस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:56 AM2018-12-16T00:56:57+5:302018-12-16T00:59:25+5:30
कृष्णूर येथील इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीतील धान्य घोटाळ्याचा तपास गुप्तचर विभागाकडे गेल्यापासून हे प्रकरण जणू थंडबस्त्यातच जमा झाले आहे़
नांदेड : कृष्णूर येथील इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीतील धान्य घोटाळ्याचा तपास गुप्तचर विभागाकडे गेल्यापासून हे प्रकरण जणू थंडबस्त्यातच जमा झाले आहे़ या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत आला? आरोपींच्या अटकेसाठी काही प्रयत्न करण्यात येत आहेत काय? याबाबत कुठलाही मागमूस लागत नसून या प्रकरणातील आरोपी मात्र खुलेआम नांदेडात फिरत आहेत़ त्यामुळे आरोपींना वाचविण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही़
१८ जुलै रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीवर छापा मारला होता़ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचे दहा ट्रक या ठिकाणी पकडण्यात आले होते़ धान्याच्या या काळा बाजार प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला होता़ प्रारंभी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता़ परंतु, प्रकरणाची वाढणारी व्याप्ती लक्षात घेता मीना यांनी सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे तपास दिला होता़
सहाय्यक पोलीस अधीक्षक हसन यांनी या प्रकरणाचा सूक्ष्म तपास केला़ प्रत्येकाची झाडाझडती घेतली़ त्यातून हा कोट्यवधींचा घोटाळा असल्याचे समोर आले़ वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार, मेगा कंपनीचे संचालक जयप्रकाश तापडीया यांचा दोनवेळेस बिलोली न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळला होता़
त्यामुळे या प्रकरणातील आरोपींचे धाबे दणाणले होते़ काहीही करुन नुुरुल हसन यांच्याकडून तपास काढून घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन हालचाली करण्यात आल्या़ या प्रकरणात जीपीएस प्रणाली, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओ चित्रीकरण, आरोपींचे कॉल रेकॉर्ड यासह अनेक भक्कम पुरावे हसन यांनी गोळा केले होते़ तसेच न्यायालयातही त्यांनी आपली बाजू जोरकसपणे मांडली होती़ असे असताना हा तपास गुप्तचर विभागाकडे सोपविण्याचा अनपेक्षित निर्णय घेण्यात आला़ हा तपास हसन यांच्याकडून काढला जावू नये यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत काहींनी धाव घेतली होती़ परंतु, त्यानंतरही गुप्तचर विभागाकडे हे प्रकरण देण्यात आले़
त्यात आता गुप्तचर विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे़ परंतु, तपास कुठपर्यंत आला याबाबत अनभिज्ञता आहे़ त्यामुळे या प्रकरणातील आरोपीही बिनधास्त आहेत़ त्यामुळे पोलीस अधीक्षक मीना, सहाय्यक पोलीस अधीक्षक हसन यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरते की काय, अशी शंका सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केली जात आहे़
आरोपींचा सार्वजनिक ठिकाणी वावर
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे करीत असताना एकही आरोपी शहरात येऊ शकत नव्हता़ आरोपींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची भीती होती़ त्यात न्यायालयातूनही त्यांना जामीन मिळत नव्हता़ त्यामुळे या प्रकरणातील मातब्बरांनी हा तपास हसन यांच्याकडून काढून घेण्याचीच इच्छा होती़ त्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचालीही करण्यात आल्या होत्या़ परंतु, आता गुप्तचर विभाग हा तपास करीत असून आरोपीही बिनधास्त झाले आहेत़ शहरात सार्वजनिक ठिकाणी खुलेआम आरोपींचा वावर सुरु आहे़ त्यामुळे तपास नेमका कशाचा सुरु आहे, याबाबत चर्चा सुरु आहे़