प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या भरतीत गैरप्रकार; आक्षेपानंतर नांदेड आरोग्य विभागाच्या भरतीला स्थगिती
By शिवराज बिचेवार | Published: September 7, 2022 04:01 PM2022-09-07T16:01:58+5:302022-09-07T16:02:18+5:30
मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये अनेक अपात्र उमेदवारांची नावे आल्याने भरतीबाबत संशय निर्माण झाला
नांदेड- राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत जिल्हा परिषदेत वेगवेगळ्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. परंतु यातील प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या भरतीत गैरप्रकार झाल्याचा आक्षेप काही उमेदवारांनी घेतला होता. त्यानंतर या भरतीला तूर्त स्थगिती दिली असून शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. विशेष म्हणजे शेजारील तीन जिल्ह्यांनी मात्र मान्यताप्राप्त डीएमएलटी धारकांना संधी दिल्याने त्यांच्यावर ही नामुष्कीची वेळ आली नाही.
जिल्हा परिषदेने राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कंत्राटी आरोग्य सेवा देण्यासाठी १ व २ सप्टेंबरला वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. परंतु मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये अनेक अपात्र उमेदवारांची नावे आल्याने भरतीबाबत संशय निर्माण झाला होता. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी १६ जागा आहेत. या जागांसाठी पात्र नसलेल्या उमेदवारांना मुलाखतीची संधी दिली गेली. प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या जागासाठी युजीसी, आरोग्य विद्यापीठ किंवा तांत्रिक विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या महाविद्यालयातून डीएमलटी प्राप्त करणे आवश्यक आहे. तसे शासन आदेशातही नमूद आहे. असे असताना मान्यताप्राप्त नसलेल्या डिएमएलटी धारकांची नावे मुलाखतीच्या यादीत आली. त्यामुळे मान्यताप्राप्त डिएमएलटी महाविद्यालयातील उमेदवारांवर अन्याय झाला.
याबाबत उमेदवारांनी जिल्हा परिषदेकडे आक्षेपही नोंदविला. त्यावेळी मुलाखती सुरु होत्या. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणात उडी घेतली. त्यामुळे अखेर या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असून शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. परंतु भरती प्रक्रिया राबविण्यापूर्वी आरोग्य विभागाला त्याबाबतच्या निकषांची माहिती नव्हती काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अपात्र उमेदवारांच्या मुलाखती
औरंगाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही अशाप्रकारे भरती करण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी फक्त मान्यताप्राप्त महाविद्यालयातील डिएमएलटी झालेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली. नांदेडात मात्र त्यांना डावलून अपात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. याबाबत आरोग्य विभागाला जाब विचारण्यात आला. त्यांनी या तक्रारी समितीसमोर ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
- माँटीसिंग जहागिरदार, मनसे जिल्हाप्रमुख
भरती प्रक्रियेला स्थगिती
प्रयोगशाळा तंत्रज्ञ भरतीबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. याबाबत शासनाकडून निकष मागवून त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तोपर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.
-डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी