नांदेड जिल्ह्यात उदासिनतेच्या गाळात अडकले प्रकल्पांचे सिंचन
By प्रसाद आर्वीकर | Published: September 16, 2023 12:00 PM2023-09-16T12:00:32+5:302023-09-16T12:02:04+5:30
प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कालबद्ध आराखडा तयार करून सिंचन वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे.
नांदेड : शेती समृद्ध करण्यासाठी सिंचनाच्या सुविधा वाढविल्या पाहिजेत. त्यादृष्टीने जिल्ह्यात थोडेफार काम झाले आहे. प्रकल्पांची उभारणी झाली. मात्र अपेक्षित सिंचन क्षमता अजूनही गाठली नाही. लेंडी, इसापूर प्रकल्प, बाभळीच्या बंधाऱ्याची कामे झाली आहेत. मात्र, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. काही प्रकल्पांची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. राजकीय आणि प्रशासकीय उदासिनतेमुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता एका मर्यादेतच अडकली असून, ती वाढविण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.
विष्णुपुरी, इसापूर, मानार हे या भागातील महत्त्वाचे प्रकल्प आहेत. विष्णुपुरी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, या प्रकल्पातून अपेक्षित सिंचन होत आहे. परंतु, लेंडी प्रकल्प, पैनगंगा नदीवरील इसापूर प्रकल्प आणि बाभळी बंधाऱ्याच्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे अद्याप हाती घेतली नाहीत. त्यामुळे सिंचनावर परिणाम होत आहे. या कामांचा आराखडा तयार करून ती वेगाने पूर्ण करण्याचे धोरण आखावे लागेल. बळेगाव येथील बंधाऱ्यासाठी कोलंबी उपसा सिंचन योजना राबविण्यात आली. याच धर्तीवर धर्माबाद, उमरी, बिलोली या तालुक्यांसाठी उपसा जलसिंचन योजनेची सुरुवात करण्याची गरज आहे. प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कालबद्ध आराखडा तयार करून सिंचन वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे.
गाव तलावांचे पुनर्जीवन
जिल्ह्यात सुमारे ७५० मालगुजारी तलाव आणि गाव तलाव आहेत. शासन एकीकडे गाव तेथे तलाव योजना राबवित असताना जुन्या तलावांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. या साडेसातशे गाव तलावांची दुरुस्ती झाली तर तलावाचे पाणी त्या त्या भागातील सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वापरता येईल. याशिवाय कालव्यांची दुरुस्ती अनेक भागात झाली नाही. ती हाती घ्यावी लागणार आहे.
तेलंगणाच्या धर्तीवर पाणी साठवा
यावर्षी पाऊस कमी राहिला, त्यामुळे प्रकल्पांत पाणीसाठा झाला नाही. पुराचे पाणी साठविण्यासाठी कोणतीही कायद्याची अडचण नाही. मात्र, दरवर्षी पुराचे पाणी पुढे वाहून जाते. त्यामुळे तेलंगणाच्या धर्तीवर पुराचे पाणी साठविण्यासाठी योजना आखावी लागणार आहे. पुराचे वाहून जाणारे पाणी मोठ्या तलावांमध्ये साठविल्यास उन्हाळ्यातील सिंचनाचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागू शकतो. त्याचप्रमाणे बाभळी बंधाऱ्यामध्ये पावसाळ्यात पाणी साठविण्याची परवानगी मिळाल्यास या बंधाऱ्यामध्ये २ टीएमसी पाणीसाठा करता येऊ शकतो. इसापूर प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून गाव तलावात पाणी साठवून घेणे आवश्यक आहे. पण त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. याशिवाय बळेगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा मावेजाचा प्रश्न अजूनही तसाच खितपत पडला असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
६० वर्षांपासून काढला नाही गाळ
कंधार तालुक्यातील बारुळ येथे १९६२ मध्ये मानार प्रकल्पाची उभारणी झाली. प्रकल्पाची उभारणी करून ६० वर्षांचा कालावधी होऊन गेला. केवळ दोन वेळा या प्रकल्पातील गाळ काढण्यात आला. या प्रकल्पात आता निम्म्यापेक्षा अधिक गाळ झाला आहे. गाळ उपसण्यासाठी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वेळेत गाळ उपसला तर सिंचन वाढण्यास मदत होणार आहे.