इसापूरचे पाणी आसनात पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:18 AM2018-04-08T00:18:26+5:302018-04-08T00:18:26+5:30
शहरवासियांची तहान भागविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून अडीच दलघमी पाणी घेण्यात आले असून प्रत्यक्षात १ दलघमी पाणी आसनेच्या पात्रात उपलब्ध होणार आहे. यातून शहरवासियांची जवळपास २५ ते ३० दिवसांची तहान भागणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरवासियांची तहान भागविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून अडीच दलघमी पाणी घेण्यात आले असून प्रत्यक्षात १ दलघमी पाणी आसनेच्या पात्रात उपलब्ध होणार आहे. यातून शहरवासियांची जवळपास २५ ते ३० दिवसांची तहान भागणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली.
विष्णूपुरीतील उपलब्ध पाण्यातून शहरवासियांची तहान भागवणे अवघड होत असल्याने नांदेड महानगरपालिकेने आसना नदीवर पर्यायी पाणीपुरवठा योजना सुरू केली. पिण्याच्या पाण्यासाठी नांदेड महापालिकेने इसापूर प्रकल्पात १० दलघमी पाणी राखीव ठेवले होते. यावर्षी इसापूर प्रकल्पाने तळ गाठल्याने इसापूरमधून नांदेडसाठी पाणी मिळेल की नाही? याबाबत साशंकता होती. मात्र इसापूर प्रकल्पातून नांदेडसाठीही अडीच दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी शनिवारी सायंकाळी ६ वाजता पोहोचले. रात्री उशिरापर्यंत जवळपास १ दलघमी पाणी आसनेमध्ये उपलब्ध होईल. दरम्यान, विष्णूपुरी प्रकल्पातही १० दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणातून घेतले जाणार आहे. १२ एप्रिलपासून हे पाणी सिद्धेश्वरमधून सोडले जाईल. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात १२.२८ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. १२ मार्च रोजी दिग्रस बंधाऱ्यातून २५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात घेण्यात आले होते. प्रकल्पातून सिंचनासाठी नियोजित पाणीपाळ्यामुळे प्रकल्पातील जलसाठा आजघडीला १५ टक्क्यांवर आला आहे. आगामी काळात पाण्याची टंचाई लक्षात घेता सिद्धेश्वरमधून १० दलघमी पाणी घेण्यात येत आहे. शहरवासियांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख, कार्यकारी अभियंता अंधारे यांनी केले आहे.
मे महिन्यात दुसरे रोटेशन मिळणार
हे पाणी सांगवी पंपावरुन काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचेल. तेथून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. इसापूरमधून उपलब्ध झालेल्या जवळपास १ दलघमी पाण्यातून शहरवासियांची २५ ते ३० दिवसांची तहान भागणार आहे. इसापूर प्रकल्पातून दुसरे रोटेशन हे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात घेतले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.