नांदेड, हिंगोलीतील सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण तुडुंब; दोन गेट उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:10 PM2024-10-09T13:10:44+5:302024-10-09T13:11:37+5:30
पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नांदेड: नांदेड जिल्ह्यासह हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण शंभर टक्के भरल्याने हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी धरणाचे दोन गेट उघडले असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत तीन जिल्ह्यांतील जवळपास १ लाख १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सिंचन केले जाते. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी इसापूर धरणातील पाणीपाळ्या शेती सिंचनासाठी महत्त्वाच्या ठरतात.
इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या जयपूर बंधा-यातून येणारा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणात येणारे अतिरिक्त पाणी इसापूर धरणाच्या सांडव्याची दोन गेट १० सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात ६९४ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणातील येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन या परिसरातील नदीकाठावरील, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात मंगळवारी धरणक्षेत्रातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचा येवा वाढल्यास धरणाचे गेट आणखी उघडण्यात येतील, असे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.