मुद्दे संपले; आता गुद्द्यांची भाषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:16 AM2021-01-17T04:16:17+5:302021-01-17T04:16:17+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीत सख्ख्ये भाऊ एकमेकांचे वैरी झाल्याचे दिसून आले. भावकीतील मंडळींनीही वेगवेगळ्या पॅनलचा प्रचार केल्याने त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. ...
ग्रामपंचायत निवडणुकीत सख्ख्ये भाऊ एकमेकांचे वैरी झाल्याचे दिसून आले. भावकीतील मंडळींनीही वेगवेगळ्या पॅनलचा प्रचार केल्याने त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. पंधरा दिवसांच्या निवडणुकीसाठी अनेकांनी आयुष्यभरासाठी नातेसंबंध तोडले. परंतु, मतदान प्रक्रियेपर्यंत अत्यंत शांततेने ही निवडणूक सुरू होती. परंतु, शुक्रवारी मतदान आटोपताच अनेकांच्या संयमाचा बांध फुटला. समोरच्या गटातील प्रत्येक जण आपला शत्रूच आहे, या ईर्षेने एकमेकांवर तुटून पडले. बिलोली तालुक्यात मुतन्याळ, उमरी तालुक्यात कळगाव, भोकर, लोहा तालुक्यात जानापुरी, कंधार तालुक्यात हाळदा, माळाकोळीजवळ गोळेगाव आदी ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. यामध्ये रक्ताचे नातेसंबंध असलेल्यांनीच एकमेकांची डोकी फोडली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात परस्पर तक्रारीवरून गुन्हे नोंदविले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी येणार आहे. परंतु, त्यापूर्वीच गुद्द्यांची भाषा करू लागले आहेत. परंतु, या गुद्दागुद्दीत गावातील विकासकामे रखडू नयेत, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करीत आहेत.