रेल्वेस्थानकावर पाठवायला जाणेही महाग;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:23 AM2021-08-25T04:23:43+5:302021-08-25T04:23:43+5:30
नांदेड : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची नियमित तपासणी करण्याबरोबरच सोडायला येणाऱ्यांवर निर्बंध घातले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी नियम ...
नांदेड : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची नियमित तपासणी करण्याबरोबरच सोडायला येणाऱ्यांवर निर्बंध घातले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी नियम शिथिल करून प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करण्यात आली. त्यामुळे कोणाला सोडायला जायचे असेल तर ३० रुपयांच्या प्लॅटफाॅर्म तिकिटाबरोबरच पार्किंगसाठीही १० ते २० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सोडायला जाणेही चांगलेच महागात पडत आहे.
नांदेड विभागातून दररोज ८० पेक्षा अधिक रेल्वे धावत आहेत; परंतु एक्स्प्रेस गाड्याच धावत असल्याने अपडाऊन करणाऱ्यांची संख्या घटली आहे. परिणामी दुचाकी पार्किंग करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्याचा फटका पार्किंगचा ठेका घेतलेल्या कंत्राटदारासही बसत आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटातून रेल्वेची कमाई
नांदेड रेल्वे स्थानकावर फ्लॅटफाॅर्म तिकिटाची नियमित तपासणी होत नाही. त्यामुळे सोडायला येणारे बहुतांशजण विनातिकिट स्थानकावर जातात. परिणामी रेल्वेला मिळणारी कमाई घटली आहे. आजघडीला दिवसाकाठी दोन ते तीन हजार रुपये प्लॅटफॉर्म तिकिटातून मिळतात.
तासानुसार पार्किंग चार्ज
रेल्वे स्थानकातील पार्किंगचा ठेका खासगी कंपनी, व्यक्तीला देण्यात येतो.
वाहने पार्किंगसाठी तासानुसार चार्ज लावला जातो. यामध्ये कार, दुचाकीला वेगवेगळे दर आहेत.
दुचाकीला चोवीस तासांसाठी १४२ रुपये, तर कारला २१२ रुपये आकारले जातात.
रेल्वे स्थानकात सोडायला गेलेल्यानंतर दुचाकीला २० रुपये पार्किंग चार्ज घेतले. त्यापेक्षा लिंबगावला नेऊन सोडलेले परवडले असते. -गजानन मोरे
सोडायला गेलेल्या वाहनधारकास पार्किंगचे चार्ज लावले जाऊ नयेत. यातून बऱ्याच वेळा पार्किंगवाल्यासोबत वाहनधारकांचे वाद होतात. - राजेश वाघमारे
रेल्वे स्थानकात येणाऱ्या वाहनांना पार्किंगचे चार्ज नियमानुसार घेतले जातात, तसेच नवीन नियमानुसार प्लॅटफॉर्म तिकीट ३० रुपये आकारले जाते. ज्यांच्याकडे तिकीट नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील वेळोवेळी करण्यात येते.
- स्टेशन मास्तर