गुढीपाडव्याला साल ठरवण्यासाठी बळीराजाकडे पैसाच नाही; मजूरी वाढली, सालदार मिळणे कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:47 IST2025-02-25T15:47:27+5:302025-02-25T15:47:53+5:30
सततच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, त्यात मजूर महाग झाल्याने शेती करणे कठीण

गुढीपाडव्याला साल ठरवण्यासाठी बळीराजाकडे पैसाच नाही; मजूरी वाढली, सालदार मिळणे कठीण
माहूर : भाऊबंदकीच्या हिस्सेवाटणीतून शेतीची विभागणी व यांत्रिकीकरणाचा वाढता वापर यामुळे शेतमालकाबरोबरच मजूरवर्गही काम करण्यास नाखूश आहेत. सालदारांची अपेक्षा वाढल्याने सततच्या अस्मानी व सुलतानी संकटाने त्रस्त झालेल्या बळीराजाकडे त्यांना देण्यासाठी पैसाच उरला नसल्याने यावर्षी शेती पडीत पडण्याचीच अधिक शक्यता आहे. येत्या गुढीपाडव्याला साल ठरवण्यासाठी बळीराजाकडे आर्थिक तरतूद नसल्याने शेतमजूर या तालुक्यात रोहयो कागदोपत्रीच असल्याने नजीकच्या आदिलाबाद ते हैद्राबाद पुणे-मुंबई ते महाबळेश्वर रोजंदारी करून पोटाची खळगी भरत आहेत.
शेतीमध्ये वर्षानुवर्षे राबणारी सालदारांची नवी पिढी आता शिक्षित होत असून, त्यातून मिळालेल्या संधीतून त्यांची मुलेबाळे शहरात जाऊन कंपन्या व शासकीय नोकऱ्यांत रमली आहेत. आता खेड्यापाड्यांत बोटावर मोजण्याइतकेच अशिक्षित कुटुंब शेतीत काबाडकष्ट करून जगत आहेत. त्यात वर्षभराची बांधिलकी ठेवण्यास कुणीही राजी नाही. त्यामुळे रोजंदारी व मासिक वेतनावर उदरनिर्वाह करणे पसंत करीत आहेत.
सालदारांचा भाव वाढला
त्यातच आर्थिक दुर्बल घटकासाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत. त्या माध्यमातून विविध उद्योग, व्यवसाय व शेतीपूरक उद्योग, व्यवसाय अनुदान, राजकीय नेत्यांच्या हस्तकांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्या गल्लीतील कार्यकर्त्यांच्या नातेवाइकांना दिले जाते. त्यामुळेच पारंपरिक सालदारकीची त्यात भर पडली आहे. अनेक सालदार भाव खात असल्याचे चित्र आहे.