महाविकास आघाडी नव्हे, ही तर सत्तेची हाव असणारी महाविनाश आघाडी: ज्योतिरादित्य शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:11 PM2024-11-14T17:11:22+5:302024-11-14T17:14:44+5:30

जातीचे राजकारण-भ्रष्टाचार-आरक्षण संपविण्याचे पाप हाच महाविकास आघाडीचा चेहरा: ज्योतिरादित्य शिंदे

It is not the Mahavikas Aghadi, but the Mahavinash Aghadi: Jyotiraditya Shinde | महाविकास आघाडी नव्हे, ही तर सत्तेची हाव असणारी महाविनाश आघाडी: ज्योतिरादित्य शिंदे

महाविकास आघाडी नव्हे, ही तर सत्तेची हाव असणारी महाविनाश आघाडी: ज्योतिरादित्य शिंदे

मालेगाव ( नांदेड) : विधानसभेची ही निवडणूक एक प्रकारचे युद्ध आहे. या युद्धातील महाविकास आघाडीतील एका पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जातीचे राजकारण केले, तर दुसरा पक्ष भ्रष्टाचाराने बरबटला आहे. तर तिसऱ्या पक्षाने आरक्षण संपण्याचे प्रयत्न केले आहेत. ही महाविकास आघाडी नव्हे, तर महाविनाश आघाडी आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना निवडणुकीत पराभूत करून त्यांना जागा दाखवा, असे आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.

लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे बुधवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या सभेला खासदार अशोकराव चव्हाण, बालासाहेब पांडे, विक्रम सिंह, सचिन साठे, अमिता चव्हाण, नरेंद्र चव्हाण, उमेदवार श्रीजया चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव इंगोले, सरपंच मारुती बुट्टे, संतोष पांडागळे, बापूराव गजभारे, केशवराव इंगोले, बळवंत पाटील आदींची उपस्थिती होती.

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, शिंदे घराण्यानी मराठ्यांचे साम्राज्य वाढवण्यासाठी ऐतिहासिक कार्य केलेले आहे. दिल्लीत मराठ्यांचा भगवा फडकवण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्यांना युद्ध जिंकण्याचा वारसा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही युद्धच आहे. महाविकास आघाडी सरकारने धर्मात व जाती-जातींत भांडणे लावण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब शेतकरी, रोजगार, महिलांसाठी चांगल्या योजना राबविल्या आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांना फक्त सत्तेची हाव आहे. सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांची त्यांना काहीच गरज नाही. महायुती सरकारला विश्वासाची विचारधारा आहे. तर आघाडी सरकारला भ्रष्टाचाराचे कलंक आहे. महायुती सरकारने गोरगरिबांची तिजोरी भरण्याचे काम केले. तर आघाडी सरकारने तिजोरी खुली करून स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले.

चव्हाण आणि शिंदे परिवाराचे अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. चव्हाण घराण्याची तिसरी पिढी राजकारणात येत आहे. त्यांना आपण साथ देऊन विकासाचा वटवृक्ष उभा करावा. कारण डॉ. शंकराव चव्हाण यांचा परिवार समाजसेवी परिवार आहे, असेही ते म्हणाले.

मालेगावातून शंकरराव चव्हाण यांची राजकीय जडणघडण : अशोकराव चव्हाण
शंकरराव चव्हाण यांना राजकीय ताकद मालेगावकरांनी दिली आहे. मालेगावच्या भूमीतूनच ते दिल्लीदरबारी गेले होते. त्यांच्या राजकीय भवितव्याची सुरुवात मालेगाववासीयांनी केली. श्रीजया चव्हाण ही मालेगावची मुलगी आहे. शंकररावांच्या नातीला आपण साथ द्यावी, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी मी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी आहे. मराठा आरक्षणासाठी कोणी राजकारण करू नये. मीही आरक्षणाचा पुरस्काराचा आहे. सदैव सोबत राहणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: It is not the Mahavikas Aghadi, but the Mahavinash Aghadi: Jyotiraditya Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.