शासकीय कामासाठी पैसे घेणाऱ्या सतरा लाचखोर आरोपींच्या निलंबनाला लागेना मुहूर्त !
By प्रसाद आर्वीकर | Published: July 18, 2023 07:49 PM2023-07-18T19:49:11+5:302023-07-18T19:49:34+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या वरिष्ठांमार्फत गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जाते.
नांदेड : शासकीय कामकाज करताना लाच घेताना पकडलेल्या नांदेड परिक्षेत्रातील १७ आरोपींचे निलंबन रखडले असून, त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई होणार केव्हा? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शासकीय कामाकरीता निश्चित करून दिलेल्या रकमेच्या तुलनेत अधिकची रक्कम लाच स्वरूप घेणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जाते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परिक्षेत्रांतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. तक्रारदाराने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून या तक्रारींची पडताळणी केली जाते. त्यात तथ्य आढळल्यानंतर पंचासमक्ष सापळा लावून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो.
१ जानेवारी ते १३ जुलैपर्यंत नांदेड विभागात विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध ३७ कारवाया करण्यात आल्या आहेत. लाचेची मागणी करणे किंवा लाच स्वीकारणे हा गुन्हा ठरतो. लाच मागितल्याचेही निष्पन्न झाल्यास आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. सहा महिन्यांमध्ये एसीबीच्या पथकाने ३७ गुन्हे दाखल केले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या वरिष्ठांमार्फत गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जाते. लाच प्रकरणात आतापर्यंत ३७ गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, त्यातील १७ लाचखोर कर्मचाऱ्यांचे निलंबन अद्याप झाले नाही. त्यामुळे लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन का रखडले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सापळ्यांची संख्या घटली
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड विभागाने मागील वर्षी १३ जुलैपर्यंत लाच प्रकरणाच्या ४२ कारवाया केल्या होत्या. या सहा महिन्यांमध्ये कारवायांची संख्या कमी झाली आहे. यावर्षी केवळ ३७ कारवाया झाल्या आहेत. विशेष म्हणजे नांदेड परिक्षेत्रातील लातूर जिल्ह्यात मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कारवायांची संख्या वाढली आहे. लातूर जिल्ह्यात मागील वर्षी ८ कारवाया झाल्या होत्या. यावर्षी १३ जुलैपर्यंत या जिल्ह्यात ९ कारवाया करण्यात आल्या आहेत.
अपसंपदेची एक कारवाई
नांदेड परिक्षेत्राच्या लातूर जिल्ह्यात यावर्षी अपसंपदा जमविल्याच्या आरोपावरून एक गुन्हा दाखल झाला आहे. इतर जिल्ह्यांत मात्र अपसंपदेची एकही कारवाई नाही.
कोणत्या विभागात रखडले निलंबन?
ग्राम विकास : ४
शिक्षण व क्रीडा : ८
महसूल : २
सहकार : २
उद्योग, ऊर्जा : १