मारहाणीत सासूला वाचवणे पडले महागात; सासऱ्याकडून सुनेची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 03:18 PM2020-08-21T15:18:33+5:302020-08-21T15:24:36+5:30
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील देगाव येथील घटना
नायगाव (जि. नांदेड) : शुल्लक कारणावरुन सासूला बेदम मारहाण करीत असताना तिला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या सुनेचा सासऱ्याकडून काठीने वार करुन खून झाला. ही घटना बुधवारी नायगाव तालुक्यातील देगाव येथे घडली आहे. या घटनेनंतर आरोपी सासरा किसन मोरे घटनास्थळावरुन पसार झाला आहे.
किसन मोरे हा सासरा पत्नी आणि दोन विधवा सुनांसोबत तालुक्यातील देगाव येथे राहत होते. नवरा-बायकोमध्ये किरकोळ कारणावरुन नेहमीच खटके उडायचे. बुधवारी सकाळीही किशन मोरे यांचे त्यांच्या बायकोमध्ये भांडण सुरू झाले. यावेळी किशन मोरे हे पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत काठीने अमानुषपणे मारहाण करीत होते. हा प्रकार पाहून घाबरलेली मोठी सून मिराबाई (३२) ही भांडण सोडविण्यासाठी गेली असता रागाच्या भरात सासरा किसन मोरे याने सुनेलाही काठीने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत मीराबाई रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाल्या व खाली कोसळल्या. मात्र, त्यानंतरही सासऱ्याकडून पत्नीस मारहाण सुरूच होती. हा आरडाओरडा ऐकूण शेजारच्या नागरिकांनी मोरे यांच्या घराकडे धाव घेतली असता सून रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे आढळून आले. शेजारच्यांनी तात्काळ सुनेला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत मीराबाई हिचा भाऊ सोमठाणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कुंटूर पोलीस ठाण्यात आरोपी किशन मोरे (वय ६५ वर्षे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर किशन मोरे हा पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक करीम पठाण यांनी सांगितले.