सासऱ्यानेच केला सुनेचा विनयभंग; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By शिवराज बिचेवार | Published: June 17, 2023 06:35 PM2023-06-17T18:35:16+5:302023-06-17T18:35:52+5:30
पीडितेने आपली सुटका करून घेत पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
नांदेड : मूलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यात येत होता. त्यातच सासऱ्यानेही वाईट नजर टाकली. आंघोळीसाठी जात असताना सासऱ्याने वाईट उद्देशाने पकडून सुनेचा विनयभंग केला. ही घटना मुखेड तालुक्यात घडली. या प्रकरणात मुखेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
२४ वर्षीय पीडितेचे लग्न २०२१ मध्ये मुखेड तालुक्यात लावून देण्यात आले होते. पीडितेला मूलबाळ झाले नसल्याने सासरच्या मंडळीकडून त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्या माहेरी गेल्या होत्या. त्यानंतर भावाने समजूत घालून सासरी आणले; परंतु सासऱ्याची वाईट नजर पीडितेवर होती. त्यातच १४ जून रोजी पीडिता ही आंघोळीसाठी जात असताना सासऱ्याने वाईट उद्देशाने त्यांना ओढले.
यावेळी पीडितेने आरडाओरडा केला. तसेच ही बाब पती आणि सासूला सांगितली; परंतु, त्यांनी पीडितेवरच खोटे बोलत असल्याचा आरोप करीत डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आपली सुटका करून घेत पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणात सासऱ्यासह पती आणि सासूच्या विरोधात मुखेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.