दाभडपासून होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:21+5:302020-12-23T04:15:21+5:30
नांदेड : शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी आता उत्तर वळण रस्त्यालाही मंजुरी मिळाली असून हा उत्तर वळण रस्ता ...
नांदेड : शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी आता उत्तर वळण रस्त्यालाही मंजुरी मिळाली असून हा उत्तर वळण रस्ता दाभडपासून मरळकपर्यंत होणार आहे. यासाठी यावर्षीच्या राज्य अर्थसंकल्पात ६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून भूसंपादनासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे सा.बां.वि.चे कार्यकारी अभियंता गजेंद्रसिंह राजपूत यांनी सांगितले.
शहरात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांचा काही अंशी ताण आहे. तो ताण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गतच उत्तर वळण रस्त्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला होता. दाभडफाटा येथून खूरगाव मार्गे मरळकपर्यंतच्या १३.७०० कि.मी.च्या रस्त्याला मान्यता मिळाली आहे. या रस्त्याची रुंदी ४५ मीटर राहणार असून ६० हेक्टर जागा त्यासाठी संपादित करावी लागणार आहे. यावर्षीच्या राज्य अर्थसंकल्पात ६५ कोटी रुपयांची तरतूद भूसंपादन आणि रस्त्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता आता लवकरच मार्गी लागणार आहे.
या रस्त्यासाठीच्या ६० हेक्टर जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. भूसंपादनाला ४० कोटी रुपये लागणार आहेत. या उत्तर वळण रस्त्यामुळे नागपूरहून परभणी, लातूरकडे जाणारी वाहने थेट पश्चिम वळण रस्ता मार्गे शहराबाहेर जाऊ शकणार आहेत. त्यामुळे शहर वाहतुकीवरील ताण निश्चितपणे कमी होईल, असेही राजपूत यांनी सांगितले.
दुसरीकडे शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विष्णूपुरी येथील नव्या इमारतीतील फर्निचर कामासाठी १७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ८ दिवसापूर्वीच या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून सहा महिन्यात हे काम मार्गी लागून वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीत कामकाजाला प्रारंभ होणार आहे.
चौकट——————-
कोरोनामुळे पश्चिम वळण रस्ता रखडला
लातूरकडून परभणी, वसमत या भागात जाणाऱ्या वाहनांसाठी पश्चिम वळण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. गुरू-ता-गद्दी कालावधीत मंजूर झालेल्या या कामातील ३ कि.मी. अंतराचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे. असर्जन चौक ते गोदावरी नदीवरील पूल नाळेश्वर- हस्सापूर जवळ हा रस्ता निघतो. तो थेट पूर्णा रस्त्याला मिळतो. त्यामुळे परभणी, वसमत, हिंगोलीकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरुनच पश्चिम वळण रस्त्यामार्गे जाणार आहे. एकूण ९ कि.मी. अंतराच्या या रस्त्यात एक रेल्वे उड्डानपूलही आहे. त्यासाठी २५ कोटींचा निधी लागणार आहे. १५ कोटी रुपये रेल्वेकडे जमा करण्यात आले आहेत. या रेल्वे उड्डानपुलाच्या कमाच्या निविदाही निघाल्या आहेत. या रस्त्यासाठी २७ हेक्टर भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी २३ कोटी रुपये खर्च झाले आहे. जमीनही ताब्यात घेवून काम सुरू करण्यात आले होते. ८ कोटी रक्कमेतून ५ कोटी रुपये खर्चही करण्यात आले. कोरोना संकटामुळे निधी प्राप्त न झाल्याने पश्चिम वळण रस्त्याचे काम थांबले आहे. ते कामही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता राजपूत यांनी सांगितले.